आषाढी वारी 2024: कौंडण्यपूर येथून श्री रुक्मिणी माता पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

कौडण्यपूर – टाळमृदुंगाचा गजर व विठ्ठल नामाचा जयघोष करीत सालाबादप्रमाणे श्री रुख्मिणी मातेच्या पालखीचे आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र पंढरपूर साठी दिनांक १२ जुन रोजी प्रस्थान झाले. संत सद्गुरू श्री सदाराम महाराजांनी सुरू केलेल्या पालखीचे हे 430 वे वर्ष आहे. मानाच्या पालख्यापैकी एक असलेली विदर्भातील ही एकमेव मानाची पालखी आहे. 33 दिवसांचा प्रवास करून पालखी दिनांक 14 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रवेश करेल. 17 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे.
त्यानिमित्त सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली. नंतर तीर्थ स्थापना तसेच संत सद्गुरू सदाराम महाराज यांच्या समाधीचे पूजन व जगत्मता आई श्री रुख्मिणी मातेच्या पादुकांचा अभिषेक श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे सचिव व पालखी सोहळा प्रमुख सदानंद साधू ह्यांचे हस्ते, अध्यक्ष नामदेवराव अमाळकर, उपाध्यक्ष वसंत डाहे, विश्वस्त हिम्मतराव टाकोणे, सुरेश काका चौहान, अशोकराव पवार, अतुल ठाकरे, हभप पंकज महाराज महल्ले, विणेकरी विठोबाची बागडे, श्याम श्रीराव, स्वप्नील जमखुटे आदींच्या उपस्थितीत पार पडला.
श्री रुक्मिणी मातेच्या पादुका पालखीत विराजमान करण्यात आल्या व सर्व वारकऱ्यांनी आईच्या पालखीचे दर्शन घेतले. भजनानंतर आरती होऊन मान्यवरांच्या उपस्थितीत जगत जननी आई रुख्मिणी माता पालखी चे ठीक ४ वाजता प्रस्थान झाले, श्री अंबिका माता संस्थान येथे चहा पाण्या नंतर पुढे मिर्झापूर येथे रवाना झाली.
पंचक्रोशीतील हजारो वारकरी आई रुख्मिणी मातेच्या पालखीला निरोप देण्यासाठी आले होते. अत्यंत भक्तिमय वातावरणात व आई रुख्मिणी मातेच्या व संत सद्गुरू सदाराम महाराजांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. पालखी प्रस्थान सोहळ्याला सत्यनारायण चांडक, सरपंच प्रेमदास राठोड, राजू काका ठाकूर, सभापती कल्पनाताई किशोर दिवे, उपसभापती रोशनी ताई मुकुंदराव पुणसे, संदीप भाऊ आमले, संजू दादा चौधरी, नायब तहसीलदार नागरे, गटविकास अधिकारी रवीराज देशमुख, अभिषेक कासोदेसह पंचक्रोशीतील हजारो वारकरी सहभागी झाले होते.





