डेंग्यूच्या रुग्णाला 6 लाखांचे बिल: आमदार संतोष बांगर म्हणाले, “रुग्णाला काय अमृत पाजलं का?”

हिंगोली: डेंग्यूच्या उपचारासाठी तब्बल 6 लाख रुपयांचे बिल आकारल्याने शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयाला चांगलेच फैलावर घेतले. “रुग्णाला काय अमृत पाजलं का?” असा सवाल करत त्यांनी रुग्णालयाच्या कारभारावर ताशेरे ओढले. या संदर्भातील त्यांचा एक ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काय आहे प्रकरण?
हिंगोली जिल्ह्यातील आदिती सरकटे यांना डेंग्यू झाल्याने छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना 6 लाख रुपयांचे बिल देण्यात आले. यामध्ये 3 लाखांचे वैद्यकीय बिल आणि 2.85 लाखांची अतिरिक्त फी आकारण्यात आली. रुग्णाच्या नातेवाईकांनी 1.80 लाख रुपये भरले असले, तरी एवढ्या मोठ्या रकमेच्या बिलावरून संतोष बांगर यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले.
संतोष बांगर यांचा संताप –
रुग्णालयाच्या डॉक्टरांशी फोनवर बोलताना बांगर म्हणाले, “डेंग्यूच्या रुग्णाला 6 लाखांचे बिल? तुम्ही एवढे बिल कसे काय लावता? माझा भाऊ स्वतः एमबीबीएस आणि एमडी आहे, त्यामुळे खोटं बोलू नका.” डॉक्टरांनी रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने व्हेंटिलेटरची गरज पडल्याचे सांगितले, पण बांगर यांनी त्यांचे म्हणणे फेटाळले. “एवढे मोठे रुग्णालय गोरगरीबांना लुटण्यासाठी बांधले आहे का? हात जोडून विनंती करतो, अशा पद्धतीने रुग्णांना लुबाडू नका,” असे ते म्हणाले.
रुग्णालयाला इशारा –
बांगर यांनी पुढे रुग्णालयाला कडक शब्दांत इशारा देत म्हटले, “जर तुम्ही अशा पद्धतीने रुग्णालय चालवणार असाल, तर आम्हालाही कारवाई करण्याचा अधिकार आहे.” त्यांनी गोरगरीब रुग्णांची लूट थांबवण्याची मागणी करत रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सामाजिक चर्चेला उधाण –
संतोष बांगर यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि व्हायरल ऑडिओमुळे रुग्णालयातील अवाजवी बिलांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा टाकणाऱ्या अशा प्रकरणांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.





