शर्थीच्या प्रयत्नानंतरही अपयश : 175 कर्मचारी, 127 स्प्रे आणि 25 फॉगिंग मशीन
– अमरसिंह भातलवंडे
पिंपरी – कीटकजन्य आजारांपैकी सर्वाधिक गंभीर असलेल्या डेंग्यू या जीवघेण्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागकडून शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतरही हा आजार रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचारी भलीमोठी साधनसामुग्री घेऊन प्रत्येक प्रभाग, तसेच झोपडपट्टीमध्ये जावून हजारो घरांची तपासणी करीत उपाययोजना करीत असतानाही डेंग्यू आटोक्यात येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची मात्र दमछाक झालेली आहे. त्यामुळे, आता डेंग्यू आटोक्यात आणायचा तरी कसा? असा सवाल आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढू लागला आहे. नोव्हेंबर महिन्यात तर डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे आरोग्य विभागाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नोव्हेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे डेंग्यूची साथ झपाट्याने वाढत चालली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात 22 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. तर संपूर्ण महिन्यात 1286 जणांना डेंग्यूची लक्षणे दिसली. त्यामध्ये 52 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नाला अपेक्षित यश आलेले नसून डेंग्यूचा कहर अद्यापही सुरुच आहे.
डेंग्यूची लागण वाढल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आरोग्य विभागाच्या 175 कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध प्रभागात जनजागृतीसाठी हजारो पत्रक वाटली तसेच मोठ्या प्रमाणात साथ पसरत असल्यामुळे नोव्हेंबर महिन्यात तब्बल 50 हजार 536 घरांची तपासणी केली होती. यामध्ये 1 हजार 99 घरामध्ये डेंग्यूची साथ पसरवणाऱ्या एडिस इजिप्त जातीच्या अळ्या आढळून आल्या होत्या. याबरोबरच घरातील भांडी, कुंड्या, यांची तपासणी करुन विविध भागातील डासोपत्ती होणारी ठिकाणेही नष्ट केली. मात्र, तरीही डेंग्यू आटोक्यात आला नाही. डिसेंबर महिन्यातही डेंग्यूचा कहर सुरुच असल्याचे पहायला आहे. डिसेंबर महिन्यात आत्तापर्यंत 23 रुग्णांना डेंग्यूची लागण झालेले स्पष्ट झाले आहे.
फवारणीही ठरतेय फोल
डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आल्यानंतर दवाखान्याकडून आरोग्य विभागाला या रुग्णांचा पत्ता मिळतो, त्यानंतर आरोग्य विभागाचे कर्मचारी तातडीने या भागात जावून त्या परिसरातील घरांची तपासणी करुन त्या परिसरात स्प्रे तसेच फॉगिंग मशीनच्या सहाय्याने औषध फवारणी करतात. तसेच परिसरातील डासोत्पत्तीची ठिकाणेही नष्ट करतात नोव्हेंबर महिन्यात सर्व प्रभागातील 2 हजार हून अधिक डासोत्पत्तीची ठिकाणी नष्ठ केली आहेत.
त्यांच्यावर कारवाई कोण करणार?
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोग्य विभाग बांधकाम व इतर व्यावसायिकांवर कारवाई करताना दिसत आहे. बांधकाम साइट्सवर पाणी साचले असले, की दंड आकारला जात आहे. परंतु महापालिकेने वेगवेगळ्या विकासकामांच्या नावाखाली संपूर्ण शहरात कित्येक ठिकाणी खड्डे खोदून ठेवले आहेत. संपूर्ण रस्ते खोदलेले आहेत. काही ठिकाणी अनेक महिन्यांपासून खड्डे तसेच आहेत. या ठिकाणी होत असलेल्या डासोत्पत्तीसाठी महापालिकेच्या संबंधित विभागावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शहरात साथीचे आजार पसरण्यासाठी नागरिक आणि व्यावसायिकांपेक्षा अधिक महापालिकेच्या ठेकेदारांनी खोदून ठेवलेले रस्ते, वेगवेगळ्या वाहिन्या ठिकठिकाणी अजूनही दिसून येत आहेत.
43 हजार रुपये दंड वसूल
नोव्हेंबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध भागातील घरांची तपासणी केली होती. त्यावेळी, अनेकांच्या घरामध्ये डेंग्यूची लागण होण्यास कारणीभूत असलेल्या आळ्या आढळून आल्या होत्या. हॉटेल, बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात आली. 16 जणांना जणांवर अधिकाऱ्यांनी कारवाई करीत त्यांच्याकडून 43 हजार 400 रुपयांचा दंड वसूल केला होता.