पिंपरी | पालिकेकडून डेंग्यू मुक्त पिंपरी-चिंचवड मोहीम

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून डेंग्यू व तत्सम किटकजन्य आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी डेंग्यू मुक्त पिंपरी-चिंचवड मोहीम (बीट डेंग्यू) राबविण्यात येणार आहे. या मोहीमेद्वारे ठिकठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. आठवडाभर ही मोहीम राबविण्यात येणार असून त्यामध्ये विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
महापालिकेतील वैद्यकीय विभागाच्या वतीने या मोहिमेला आज सोमवारी (दि. १५) सुरुवात करण्यात आली आहे. जबाबदार व्हा, स्वतःला आणि इतरांना शिक्षित करा, पीसीएमसी सारथीला सतर्क करा आणि पाणी साचू देऊ नका या थीमवर मोहिमेच्या माध्यमातून भर देण्यात येणार आहे.
डेंग्यूबाबत नागरिकांमध्ये जगजागृती करणे आणि डेंग्यूला रोखण्याचे महापालिकेसमोर उद्दिष्ट आहे. या मोहिमेत नागरीकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि आंतरविभागीय समन्वय राखण्यासाठी बीट डेंग्यू मोहिम उपयुक्त ठरणार आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी वैद्यकीय विभागातील अधिका-यांशी चर्चा करताना म्हटले आहे.
मोहिमेद्वारे राबविण्यात येणारे उपक्रम
या मोहिमेअंतर्गत आठवडाभर शासकीय आणि खाजगी रुग्णालये याठिकाणी डास उत्पत्ती स्थळांची तपासणी करणे, पॅम्प्लेट वितरित करणे आणि मार्गदर्शक केले जाणार आहेत. सरकारी आणि खाजगी कार्यालयांत डास उत्पत्ती स्थळ तपासणी, जनजागृती, व्याख्याने आणि पॅम्फ्लेट वाटप केले जाणार.
शाळांमध्ये व्हिडिओ किंवा ऑडिओ क्लिपद्वारे जनजागृती केली जाणार आहे. पोस्टर स्पर्धा, व्याख्याने आणि रॅली असे विविध उपक्रम घेतले जाणार आहे. सोशल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या आधारे आणि आयईसी टीम्सद्वारे मोहिम व्यापक केली जाणार आहे.
प्रसिद्ध व्यक्तींतर्फे जनजागृती संदेश तसेच सोशल मीडिया बाईट्स यांचा ही समावेश आहे. मोहिमेच्या व्यापक प्रसिद्धीकरिता गणेश मंडळ, स्वयंसेवी संस्था आणि ज्येष्ठ नागरिक मंच यांची मदत घेतली जाईल. मॉल्स, थिएटर आणि उद्यानांमध्ये डेंग्यू जनजागृतीचे व्हिडिओ दाखविले जातील. पॅम्प्लेट वितरण तसेच पथनाट्यांचे आयोजन देखील केले जाणार आहे.





