आळंदी- आळंदी शहरात अद्याप करोनाचा शिरकाव झाला नसला तरी नगरपरिषद हद्दीबाहेर करोनाचे थैमान असताना आळंदीतील प्रभाग आठमधे मात्र डेंग्यू, चिकुनगुनियाच्या संसर्गाने 50 पेक्षा अधिक नागरिक गेल्या तीन चार दिवसांत विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आळंदीतील देहूफाटा परिसरात सध्या डेंग्यूचे दोन आणि चिकुनगुनियाच्या आजाराने अनेक नागरिकांना ताप झाला आहे. भोसरी, मोशी, आळंदीतील विविध रूग्णालयात नागरिक उपचार घेत असून अनेकांचे डेंग्यू व चिकुनगुनियाचे वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तब्बल 50 पेक्षा अधिक नागरिक सध्या तापाच्या साथीच्या आजाराने त्रस्त असून एकाच कुटुंबातील तीन चार जणांना उपद्रव झाला आहे. देहूफाटा येथील नगरसेवक सचिन गिलबिले आणि माजी नगरसेवक दिनेश घुले यांच्या जवळच्या नातलगांनाच डेंग्यू आणि चिकुनगुनियाने त्रस्त केल्याने विषय ऐरणीवर आला. स्वत: गिलबिले यांनी पालिका प्रशासनाच्या कानावर ही बाब सांगूनही अद्याप पालिकेकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. नगरसेवक गिलबिले यांनी सांगितले की, करोनाच्या नावाखाली पालिकेतील कर्मचारी असून नसल्यासारखे आहे. तर मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्याकडे आळंदीबरोबरच चाकण पालिकेचा कारभार असल्याने त्यांचेही दुर्लक्ष आहे. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत असल्याने प्रशासनावर नाराजी आहे. वेळेत कचरा न उचलल्याने मच्छरांची संख्या वाढली. शहरात धुरळणी यंत्राद्वारे जंतूनाशक पावडर आणि फॉंगिंगची मागणी करूनही अद्याप पालिकेने धुरळणी केली नाही. साथीच्या रोगांचा वेगाने फैलाव होत असताना प्रशासन मात्र ढिम्मच आहे. नगरसेवक सचिन गिलबिले आणि दिनेश घुले यांनी सांगितले, तक्रार करूनही पालिका प्रशासनाकडून अद्याप प्रतिसाद मिळाला नाही. डेंग्यूच्या मच्छरांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर आणखी काही नागरिकांना उपद्रव होण्याची शक्यता आहे. आधिच करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्याने लोकांकडे आर्थिक क्षमता खालावली. त्यातच या आजारांळे होणारा खर्च परवडणारा नसल्याने तातडीची उपाययोजना होणे आवश्यक आहे. याबाबर पालिकेची बाजू जाणून घेण्यासाठी मुख्याधिकारी समीर भूमकर यांना दुरध्वनीद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. देहूफाटा परिसरात घरोघरी जाऊन आरोग्य विभागाने सर्व्हे केला. नागरिकांनी साठवून ठेवलेल्या पाण्यामधे मच्छरांच्या अळ्या सापडल्या. याबाबत पालिकेला कल्पना दिली. तसेच नागरिकांनी पाणी साठवताना त्यावर झाकण ठेवावे. सध्या ग्रामीण रुग्णालयात 30 बेड उपलब्ध असून तातडीची मदत देणे शक्य आहे. नगरपालिकेस जंतुनाशक फवारणी व कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. – डॉ. गणपत जाधव, वैद्यकीय अधिकारी, आळंदी ग्रामीण रुग्णालय