पिंपरी | पवनानगर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम बंद करण्याची मागणी

कामशेत, (वार्ताहर) – कामशेत ते पवनानगर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत आहे. हे काम त्वरीत काम बंद करावे, अशी मागमी माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कामशेत ते पवनानगर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या कामासंबंधी माहिती घेतली असता ते प्रमाणी होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यात योग्य प्रमाणात काँक्रिट, स्टील तसेच इतर साहित्य वापरणे बंधनकारक असताना देखील ते वापरले जात नाही. मनमानी पध्दतीने काम करून ठेकेदाराला फायदा मिळवून देण्याचा अधिका-यांचा यातून हेतू स्पष्ट होत आहे, असा आरोप माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
मावळ तालुक्यातील अशा प्रकारे चालणा-या सर्व कामांचा विचार करावा. तसेच लाखो, करोडो रूपये या विकासासाठी आणत आहात. परंतु, संबंधित ठेकदार व अधिकारी योग्य प्रकारे काम करत नसल्याने विचार करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन मावळचे आमदार सुनील शेळके यांना दिले आहे. या वेळी माहिती अधिकारी कार्यकर्ते दत्तात्रय काजळे, गणेश लालगुडे, मच्छिंद्र गुजर हे उपस्थित होते.





