पिंपरी | किल्ले लोहगड अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी

पवनानगर, (वार्ताहर) – किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटाव हा मुद्दा तापलेला असताना, मावळ तालुक्यात देखील किल्ले लोहगड येथील अतिक्रमण हटविण्यासाठी बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
लोहगड किल्ला अतिक्रमणमुक्त व्हावा यासाठी बजरंग दल आणि सखल हिंदू बांधव यांच्या वतीने शनिवारी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘हे महादेवा शक्ती दे, लोहगडला मुक्ती दे’ अशा घोषणांनी लोहगड पायथा दणाणून गेला होता.
मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेला लोहगड किल्ला आता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला असून गडावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामामुळे गडाचे वैभव आणि पावित्र्य नष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे हे बांधकाम त्वरित काढण्यात यावे, अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत केंद्रीय पुरातत्व विभाग, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार मावळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लोहगडावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





