Nevase News : राहुरी- शनिशिंगणापूर नियोजित रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी; आमदारांसह पालकमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Nevase News : या निर्णयामुळे शेकडो शेतकरी कुटुंबांवर विस्थापनाचे आणि त्यांच्या उपजीविकेच्या गंभीर समस्याचे संकट उभे राहणार असल्याचे सांगून या नियोजित रेल्वे मार्गाला यावेळी आमदारानीं मोठा कडाडून विरोध केला आहे.

नेवासे : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी ते शनिशिंगणापूर या २१.८४ किमी नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी दिलेली असून ४९४.१३ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा दररोज येणाऱ्या हजारो भाविकांची सोय करणे असला तरी या परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक बागायती जमिनींचे प्रचंड नुकसान होणार असल्यामुळे या नियोजित रेल्वे मार्गाला स्थानिक शेतकर्यांचा तीव्र विरोध सुरू झालेला आहे.
त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नेवाश्याचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी मंगळवार (दि.२८) रोजी मुंबई मंत्रालयात भेट घेऊन राहुरी – शनिशिंगणापूर रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी यावेळी या शिष्ठमंडळाने केली.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्ह्यातील आमदारानी मुंबई मंत्रालयात भेट घेवून राहुरी – शनिशिंगणापूर नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेमुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक बागायती जमिनींचे मोठे नुकसान होणार असल्यामुळे या शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेल्या या जमिनी संपादित होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
या निर्णयामुळे शेकडो शेतकरी कुटुंबांवर विस्थापनाचे आणि त्यांच्या उपजीविकेच्या गंभीर समस्याचे संकट उभे राहणार असल्याचे सांगून या नियोजित रेल्वे मार्गाला यावेळी आमदारानीं मोठा कडाडून विरोध केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी झालेल्या या चर्चे दरम्यान या शिष्ठमंडळाने सांगितले की, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये तसेच त्यांच्या सुपीक जमिनी आणि उपजीविकेचे साधन हिरावले जाऊ नये यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून सर्वंकष विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या समोर बोलतांना केली. अन्यथा आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठीचा हा लढा असाच शेवटपर्यंत सुरू ठेवू असा निर्धार आणि सज्जड इशारा यावेळी स्पष्टपणे बोलतांना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील, आमदार प्राजक्तदादा तनपुरे आणि आमदार विक्रम पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलतांना दिला.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी घेतली ठाम भूमिका
राहुरी – शनिशिंगणापूर या नवीन रेल्वे मार्गाच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मुंबई मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा रेल्वे मार्ग रद्द करण्याची मागणी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन सादर करत शेतकऱ्यांच्या जमीन भूसंपादन प्रक्रियेचा तीव्र निषेध नोंदविलेला असून शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी ठामपणे ही भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर मांडली आहे.





