Rohini Khadse : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना थेट आर्थिक मदत देणे हा आहे. या योजनेचा लाभ कायम ठेवण्यासाठी काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे लाभार्थ्यांना E-KYC करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्य सरकारने याची अंतिम मुदत वाढवून 30 एप्रिलपर्यंत केली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात E-KYC प्रक्रियेदरम्यान महिलांकडे शरीरसुखाची मागणी केल्याचे दोन धक्कादायक प्रकार समोर आल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारचे लक्ष वेधले आहे. रोहिणी खडसे यांनी एक्सवरील ट्वीटमध्ये आमच्या जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्याचे दोन धक्कादायक प्रकरण घडले आहेत, असा गंभीर आरोप केला आहे. मंत्री महोदय आदिती तटकरे, स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपले याकडे लक्ष आहे का? असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ट्वीट टॅग करत निवडणुकीपूर्वी महिलांना लाभ देताना कोणतीही अट नव्हती, मात्र आता विविध अटी-शर्ती लावून महिलांना अडचणीत टाकले जात असल्याचे त्यांनी म्हटले. आमच्या जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेची E-KYC करण्यासाठी महिलांकडे शरीरसुखाची मागणी करण्याचे दोन धक्कादायक प्रकरण घडले आहेत. मंत्री महोदय @iAditiTatkare, स्वतःची पाठ थोपटून घेण्यातून आपल्याला वेळ मिळाला असेल तर आपले याकडे लक्ष आहे का ? @mieknathshinde भाई, २०२४ च्या विधानसभा… — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) April 12, 2026 E-KYC प्रक्रियेदरम्यान महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. बँक खाते, मोबाईल नंबर, कागदपत्रे यामध्ये अडचणी येत असून, काही महिलांना सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही योजनेतून वगळले जात असल्याची तक्रार आहे. त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणात धावपळ होत आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे. या मागणीला सरकार काय भूमिका घेते याकडे लक्ष असणार आहे. हेही वाचा : Ashok Kharat Case : ‘शिजूका-नॅाडी’ कोण? अंजली दमानिया यांच्या दाव्याने खळबळ