समुद्र टापूवर अडकून पडलेल्या खलाशांची सुटका करण्याची मागणी

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात भारतामध्ये होत असल्यामुळे देश पूर्णपणे लॉक डाऊन करण्यात आलेला आहे. लॉकडाऊनचा फटका सर्व स्तराबरोबर कोळी आणि खलाशांना बसलेला आहे. मुंबईतील मड आणि भाटी या परिसरातील समुद्र टापुंवर साडेतीन हजारांपेक्षा जास्त खलाशी अडकून पडलेले आहेत.
भारतातील विविध राज्यांसह मुंबईत ही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाली होते. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जनता कर्फ्यू चं आवाहन केलं होतं. एक दिवसाच्या कर्फ्यू नंतर पुन्हा सुरळीत व्यवहार सुरू झाले होते. याच दरम्यान मुंबई परिसरातील काही खलाशी मासे पकडण्यासाठी समुद्राच्या आत गेले होते. मासे पकडून झाल्यानंतर जेव्हा ते किनारी आले त्यावेळी संपूर्ण देश लॉक डाऊन झालेला आहे, अशी त्यांना माहिती देण्यात आली. तसंच ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांनी थांबावं अशा प्रशासनाच्यावतीने त्यांना सूचनाही देण्यात आल्या होत्या.
मुंबई परिसरातील बेटांलगत साडेतीन हजारांहून अधिक खलाशी लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. मुंबईतील मड परिसरात 499 बोटी तर भाटी परिसरात 120 बोटी अडकल्या असून साडेतीन हजार खलाशी यामध्ये आहेत. या खलाशांकडे उपलब्ध असलेला अन्न धान्याचा साठा संपला असून राज्य सरकारने आपली या ठिकाणाहून सुटका करावी अशी मागणी या खलाशांकडून होत आहे. आपली आरोग्य चाचणी करून राज्य सरकारने आपल्या घरी सोडावं अशी विनंती हे खलाशी करत आहेत.





