अहमदनगर : साई समाधी मंदिर खुले करण्याची मागणी

नेते, भाविक व व्यापाऱ्यांची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बाळासाहेब सोनवणे
शिर्डी – देशाच्या इतिहासात करोनामुळे प्रथमच शिर्डीचे साई समाधी मंदिर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शिर्डीबरोबरच परिसरातील शेकडो गावांच्या अर्थकारणाला त्याचा फटका बसला आहे. सर्व धर्म समभावाचे प्रतीक असणारे शिर्डीचे साई समाधी मंदिर आता लवकरच भाविकांच्या दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते व भक्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शिर्डीतील सर्व अर्थकारण हे येणाऱ्या साई भक्तांवरच अवलंबून आहे. राज्यातील सर्वांत श्रीमंत मानले जाणारे श्री साईबाबा संस्थान आहे. येथे जवळपास सहा हजार कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या पगारापोटी अठरा कोटी रुपये खर्च होतात, तर मंदिर जरी बंद असले, तरी दररोज पन्नास ते साठ लाख रुपये इतका खर्च अनिवार्य आहे. शिर्डी शहराच्या बाजारपेठेत दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. परिसरातील शेकडो गावांतील कुटुंबांची रोजंदारी येणाऱ्या भाविकांवरच अवलंबून आहे. करोना महामारीमुळे हाताला काम नसल्यामुळे हजारो मजुरांनी स्थलांतर केले आहे. भक्तांवर अवलंबून असणारे सर्व व्यवसाय, हॉटेल, लॉजिंग, हार, प्रसाद दुकाने, व्यापारी संकुले, छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. शिर्डीत मंदिर बंद असल्याने गेल्या पाच महिन्यांपासून शुकशुकाट आहे. येथील प्रत्येकाला प्रतीक्षा आहे ती मंदिर उघण्याची.
त्यामुळे आता सर्वच राजकीय प्रतिनिधी एकवटले असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांना तसे निवेदनही दिले आहे. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते व ग्रामस्थ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार असून, शिर्डीतील साई मंदिरातील दर्शन व्यवस्था, भक्तांच्या आरोग्याची काळजी, यावर ते चर्चा करणार आहेत. शिर्डी व परिसरातील शेकडो गावांचे अर्थकारण सुरू व्हावे, यासाठी सरकारने लवकरच साई मंदिर भक्तांसाठी खुले करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





