Satara: मुंबई- बंगळुरु वंदे भारत रेल्वे सातारा-कराड मार्गे हवी! सातारा जिल्हा उदासीनच; पश्चिम महाराष्ट्रातील नेते व संघटनांकडून पाठपुरावा
Satara कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रासाठी समतोल व न्याय्य कनेक्टिव्हिटी आवश्यक असून त्यामुळे या भागातील आर्थिक, औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि पर्यटन केद्रांना फायदा होऊ शकतो. आता रेल्वे स्थानकांची स्थिती सुधारत आहे.

Satara: रेल्वेची मुंबई ते बंगळुरु ही स्लिपर वंदे भारत गाडी सांगली, कराड, बेळगाव, धारवाड, हुबळी, तुमकुर यामार्गे सुरु व्हावी, यासाठी विविध संघटना, संस्था, लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रवासी संघटनांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, या सर्व प्रयत्नांमध्ये सातारा स्थानकावर या गाडीला थांबा मिळावा आणि ही गाडी सातारा मार्गे यावी या मागणीसाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याचे चित्र आहे. सातारकरांनी उदासीनता दूर ठेवून इतरांच्या या मागणीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली तर ही गाडी सातारा- सांगली मार्गे कर्नाटकातून बंगळुरुसाठी जाण्यासा मोठा दबाव निर्माण होऊ शकेल.
कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रासाठी समतोल व न्याय्य कनेक्टिव्हिटी आवश्यक असून त्यामुळे या भागातील आर्थिक, औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक आणि पर्यटन केद्रांना फायदा होऊ शकतो. आता रेल्वे स्थानकांची स्थिती सुधारत आहे. तसेच लोहमार्ग दुहेरी झाला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि धारवाडचे खासदार प्रल्हाद जोशी यांच्या प्रयत्नांतून ही वंदे भारत गाडी सुरु झाली. परंतु, ती मुंबईहून निघाल्यानंतर पुण्यातून दौंड- सोलापूर- गुंटकल मार्गे बंगळुरला जाते. ही गाडी पुण्यातून सातारा- कराड- सांगली- बेळगाव, धारवाड- हुबळी- तुमकुर या मार्गे जावी यासाठी पूर्वीपासून पाठपुरावा सुरु होता. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. सध्याही हे प्रयत्न सुरु असून या संस्था व प्रतिनिधींनी आता सोशल मीडियाद्वारेच पंतप्रधान मोदी यांनाच याबाबत हस्तक्षेप करुन मागणीबाबतचे साकडे घातले आहे. सोशल मीडियावरील या आवाहनात मात्र पुण्यानंतर या गाडीला थेट सांगलीचा थांबा दाखवला आहे. सातारा व कराड हे दोन्ही थांबे वगळले आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रवासी संघटना, लोकप्रतिनिधी व प्रमुख नेत्यांन्या उदासीनतेचा हा फटका जिल्ह्याला बसू शकतो.
ही गाडी सातारा- सांगलीमार्गे पुढे जावी या मागणीसाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी, बंगळुरु दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्या, राज्यसभेचे खासदार इरन्ना कड्डी, दावणगेरेचे खासदार प्राभा मल्लिकार्जुन, बंगळुरु मध्यचे खासदार पी. सी. मोहन, सांगलीचे खासदार विशाल पाटील व आमदार सुधीर गाडगीळ यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्र रेल्वे प्रवासी ग्रूप, कर्नाटक रेल्वे प्रवासी ग्रूप, हुबळी इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिटीझन फोरम, बेळगावी रेल्वे युजर्स फोरम, सांगली रेल्वे डेव्हलपमेंट ग्रूप, एसडब्ल्यूआर प्रवासी समिती दावणगेरे या प्रवासी व इतर संघटनांनी ही रेल्वे यामार्गे सुरूहोण्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्याशिवाय महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर, पश्चिम महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर अँड एज्युकेशन, बेलगावी चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री, कर्नाटक चेंबर आॅफ कॉमर्स, सांगली जिल्हा व्यापारी महासंघ, सांगली चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री या संस्थांनीही ही रेल्वे गाडी पष्चिम महाराष्ट्रातून कर्नाटकात जावी, अशी मागणी लावून धरली आहे.
सातारकरांनी पुढाकार घेणे गरजेचे…
सातारा जिल्ह्याला लोकसभेचे दोन आणि राज्यसभेचे एक असे तीन खासदार व दहा आमदार आहेत. त्यापैकी चार कॅबिनेट मंत्री आहेत. कर्नाटक व बंगळुरु शहराशी शिक्षण, नोकरी, व्यापार, उद्योग यादृष्टीने कनेक्टिव्हिटी वाढण्याची गरज निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्यात पर्यटन विस्तार आणि वाढीसाठी प्रचंड वाव आहे. असे असले तती मात्र, याजिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या मागणीबाबत अजून तरी सकारात्मकता दाखवलेली नाही. सातारा जिल्ह्तील उद्योजकांची संघटना तसेच व्यापारी व इतर संघटनांनी आता यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.





