चंदीगढ : हरियाणातील भारतीय जनता पार्टीचे सरकार अल्पमतात आले असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाकडून केला जातो आहे. या राज्यात काहीतरी भूकंप घडवून आणण्याचाही कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याची चर्चा असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते भूपेंद्र हुडा यांनी आज राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांच्याकडे निवेदन सादर करून राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी केली आहे. हुडा यांच्यासोबतच्या शिष्टमंडळात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयभान आणि अन्य तीन आमदारांचा समावेश होता. अगोदर कॉंग्रेसने विश्वासदर्शक ठरावाची अर्थात सरकारने सभागृहात बहुमत सिध्द करावे अशी मागणी केली होती. मात्र आता रणनीतीत बदल करून त्यांनी राज्यपालांकडे सरकार बरखास्तीची मागणी केली आहे. भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याची कदाचित जाणीव झाल्याच्या पाश्र्वभूमीवर पक्षाने हा निर्णय घेतला असावा असे सूत्रांचे म्हणणे आहे. लोकसभा निवडणुकीत अनपेक्षीत यश मिळाल्यामुळे राजकीय आघाडीवर हरियाणा कॉंग्रेसमध्ये उत्साह असून त्यांनी आता पूर्ण फोकस विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत केला आहे. दरम्यान, कॉंग्रेसने सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आव्हान दिले तेंव्हा पूर्वी भाजपसोबत सत्तेत असलेल्या आणि आता बाहेर पडलेल्या जननायक जनता पार्टीचे नेते दुष्यंत चौटाला यांनीही बहुमत सिध्द करण्याची सरकारकडे मागणी केली होती. दरम्यान, भाजप सरकारला बहुमतासाठी ४४ संख्याबळाची गरज असताना त्यांच्याकडे ४३ आमदार आहेत व ते आमदारांच्या खरेदीत गुंतले असल्याचा आरोप उदयभान यांनी केला. तर या सरकारकडे सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आणि राज्यपालांनी आमदारांची समोरासमोर परेड करावी अशी मागणी हुडा यांनी केली.