Bhor : भूस्खलनात झालेल्या नुकसानीच्या भरपाईची मागणी
Bhor : मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसून अर्जाचे उत्तरही दिले नसल्याने, आता आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? असा संतप्त सवाल शेतकरी धोंडिबा मालुसरे यांनी केला आहे.

भोर : भोर-महाड रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, रस्ता रुंदीकरणासाठी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आले आहे. या उत्खननामुळे ठिसूळ झालेल्या भागाचे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जोरदार भूस्खलन झाले. यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनींचे मोठे नुकसान झाले असून, बाधित शेतकऱ्यांकडून तातडीच्या भरपाईची मागणी जोर धरू लागली आहे.
हिर्डोशी (ता. भोर) हद्दीत जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भोर-महाड मार्गावरील रस्त्याशेजारील भागाचे भूस्खलन होऊन धोंडिबा लक्ष्मण मालुसरे या शेतकऱ्याच्या गट नंबर ६१ मधील एक एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. या शेतजमिनीत मुशी जातीच्या बांबूची लागवड करण्यात आली होती. भूस्खलनात बांबू मातीखाली गाडले गेल्याने अंदाजे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कळवूनही कोणतीही दखल घेतली गेली नाही. तरी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी मालुसरे यांनी महसूल मंत्री, पालकमंत्री यांसह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे अर्ज दिले आहेत. मात्र, प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतली नसून अर्जाचे उत्तरही दिले नसल्याने, आता आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? असा संतप्त सवाल शेतकरी धोंडिबा मालुसरे यांनी केला आहे.
रस्त्या शेजारील माझ्याही जमीनेचे नूकसान झाले असून राहत्या घराला धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीत माझ्या कुटुंबाला स्थलांतरित करण्यात आले होते. झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी व घराच्या धोक्याबाबत शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा.
– विठ्ठल बाबुराव धामुनसे, शेतकरी, हिर्डोशी.नीरा देवघर धरण झाल्यावर २० वर्षापुर्वी हा रस्ता झाला आहे. त्यावेळेपासून कधीही आमच्या जमीनीचे भूस्खलन झाले नव्हते. परंतू, सध्या सुरु असलेल्या रुंदीकरणाच्या कामांमुळे मालकी हक्काच्या जमीनीचे भूस्खलन होऊन आम्हा शेतकऱ्यांचे नूकसान झाले आहे. नूकसान भरपाई मिळावी हिच आमची अपेक्षा आहे.
-धोंडिबा मालुसरे, शेतकरी, हिर्डोशी.





