फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गासाठी बजेटमध्ये तरतूद करण्याची मागणी

फलटण – फलटण ते पंढरपूर या 108.7 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्तावित असून या रेल्वेमार्गासाठी सुमारे रुपये 1153 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण खर्च रेल्वे मंत्रालय करू शकत नाही. त्यामध्ये राज्याने 50 टक्के वाटा उचलावा, असे पत्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असल्याची महिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
फलटण ते पंढरपूर असा नवीन प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी रेल्वे बजेटमध्ये मान्यता मिळाली असून महाराष्ट्र शासनाच्या वाट्याचा फलटण पंढरपूर रेल्वे साठीचा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा व त्याबाबत राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करावी, अशा आशयाचे पत्र रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 19 फेब्रुवारी रोजी लिहिले असल्याचे खासदार निंबाळकर यांनी सांगून सध्या फलटणवरून लोणंदला जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरू असून फलटण येथून पुण्याला रेल्वे सोडण्यात यावी, अशी मागणी केलेली होती. त्यानुसार फलटण ते पुणे अशी रेल्वेची चाचणी आगामी 90 दिवसांमध्ये घेण्यात यावी असे आदेश रेल्वेमंत्र्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान दिले असल्याचेही खा. निंबाळकर यांनी स्पष्ट केले.





