Pimpri : कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी

मावळ : राज्यातील पारंपरिक फुलउत्पादक शेतकऱ्यांनी कृत्रिम फुलांच्या वाढत्या वापराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर जोरदार मोर्चा काढत आपला संताप व्यक्त केला. फ्लॉवर ग्रोव्हर कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात राज्यभरातून हजारो शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कृत्रिम फुलांना बाजारपेठेत मिळणारा वाढता प्रतिसाद आणि मागणी यामुळे नैसर्गिक फुलांची विक्री घटली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च वाढत असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शासनाकडे कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालण्याची आणि नैसर्गिक फुलउत्पादनाला संरक्षण देणारी धोरणे लागू करण्याची मागणी केली.
या मोर्चाला शासकीय आणि राजकीय पातळीवरही मोठा पाठिंबा मिळाला. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली. कृत्रिम फुलांच्या अतिरेकामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून याकडे शासन गांभीर्याने पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी लवकरच या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
मावळचे आमदार सुनील शेळके यांनी देखील आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. ‘‘पारंपरिक शेती आणि नैसर्गिक फुलांचे संवर्धन आवश्यक असून, शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी मी सदैव पुढे राहीन’’ असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्यांचे त्वरित निराकरण व्हावे यासाठी ते शासन दरबारी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या आंदोलनात आमदार बाबाजी काळे, आमदार महेश शिंदे, आमदार शंकर मांडेकर यांच्यासह अनेक भागांतील शेतकरी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मोर्चा पूर्णपणे शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गाने पार पडला.





