Pune District : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
Pune District : काही व्यवहारांमध्ये नियमबाह्य पद्धतीने आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शिरूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप उपबाजारात सेवा/बाजार शुल्क व इतर आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय व्यक्त करत निळ वादळ संघटनेने सखोल चौकशीची मागणी केली आहे. याबाबत संघटनेच्या अध्यक्षा दिपिका भालेराव यांनी बाजार समिती शिरूर प्रशासनाला याबाबत लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उपबाजारात कार्यरत काही कर्मचारी, अधिकारी, आडतदार व दलाल यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत सातत्याने चर्चा होत असून, काही व्यवहारांमध्ये नियमबाह्य पद्धतीने आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे बाजार समितीच्या आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संघटनेने १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीतील सर्व सेवा व बाजार शुल्क वसुलीची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच व्यापारी, आडतदार, दलाल आणि बाजार समितीतील कर्मचारी यांच्यातील आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात यावी, संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या बँक खात्यांची चौकशी करावी, महसुली नोंदी, संगणकीय नोंदी, पावत्या व इतर कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, तसेच प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी समिती नियुक्त करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, मागण्यांची दखल न घेतल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे पिंपळे जगताप उपबाजारातील आर्थिक व्यवहारांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, बाजार समिती प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.





