बुध -ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील मुरुमाचे उत्खनन करून तो मुरूम सातारा- लातूर महामार्गाच्या कामासाठी वापरून शेतकऱ्याची फसवणूक केल्याबद्दल भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. याबाबत उबाळे यांनी कोरेगावच्या तहसीलदार रोहिणी शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सातारा- कोरेगाव रस्त्यापासून आतमध्ये काही अंतरावर ल्हासर्णे हद्दीत असलेल्या गट नं. 992 मध्ये बबन दत्तू चव्हाण यांच्या मालकीची शेतजमीन आहे. या शेतजमिनीतील मुरुमाचे उत्खनन करून रस्त्याचा भराव तयार करण्यासाठी ठेकेदाराने मुरूम नेल्याचे निदर्शनास आले आहे. या ठेकेदाराने मुरूम नेताना “आपल्या शेतातील मुरूमाच्या मातीचा भराव टाकून शेतीची लेव्हल करून देतो, असे तोंडी सांगितले होते. 10 ते 12 हजार ब्रास मुरूम उत्खनन करून नेले असून याची रॉयल्टी आपल्या कार्यालयात भरली आहे का, या सर्व बाबीमध्ये शासकीय यंत्रणा मदतीस होती का, आदी प्रश्न निवेदनात केले आहेत. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणा व ठेकेदाराने ही शेती पिकणेयोग्य करून द्यावी. अन्यथा शेतकरी तसेच चव्हाण कुटुंबातील लोक तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे, असा इशारा उबाळे यांनी दिला आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांकडे दिल्याचेही उबाळे यांनी सांगितले.