शिरूर: शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयीन वेळेत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात भूमिपुत्र प्रतिष्ठानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी अशा अधिकाऱ्यांच्या हजेरी व हालचाल रजिस्टरची तपासणी करून कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्तांना सादर करण्यात आले आहे. नगरपरिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकाची नियुक्ती आहे आणि मुख्याधिकारी प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. मात्र, विविध विभागांचे अधिकारी सातत्याने गैरहजर राहत असल्याने नागरिकांच्या कामांना खीळ बसत आहे. कार्यालयीन वेळेत अधिकारी नसल्याने नागरिकांना खेटे घालावे लागत असून, यामुळे नाराजीचे वातावरण आहे. निवडणुका न झाल्याने लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती आहे, याचा फायदा घेत काही अधिकारी जबाबदारी टाळत असल्याचा आरोप कुटे यांनी केला. भूमिपुत्र प्रतिष्ठानने अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची चौकशी आणि दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.