NEET पेपर लीकच्या CBI तपासाची मागणी ; सर्वोच्च न्यायालयाने NTA ला नोटीस बजावत मागितले उत्तर

NEET Exam Controversy । सर्वोच्च न्यायालयात आज कथित पेपरफुटी आणि NEET परीक्षेतील अनियमितता यासंबंधीच्या याचिकांवर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान, न्यायालयाने NEET परीक्षा आयोजित करणाऱ्या एजन्सी ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) ला नोटीस बजावली आहे. CBI तपासाची मागणी करणाऱ्या याचिकेवर उत्तर मागितले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या याचिका वेगवेगळ्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनाही न्यायालयाने नोटीस बजावली आहे. एनटीएने दाखल केलेल्या याचिकांवर त्यांचे उत्तर मागितले आहे. यावेळी एनटीएचे उत्तर जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
एनटीएकडून न्यायालयात उत्तर दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जुलै रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, ही बाब २४ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत न्यायालयाने या प्रकरणावर लवकर सुनावणी करावी. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, आम्हाला त्याचे गांभीर्य समजते. वकिलाने विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचाही उल्लेख केला. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने, असे भावनिक युक्तिवाद करू नका, कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून एनटीएचे उत्तर पाहणे आवश्यक आहे.” म्हटले.
अनेक शहरांमध्ये विद्यार्थी आंदोलन NEET Exam Controversy ।
NEET परीक्षेच्या कथित पेपर फुटीवरून देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर पेपरफुटीच्या विरोधात निदर्शने करत असतानाच कोलकाता येथील विकास भवनाबाहेरही निदर्शने पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या एका गटाने जंतर-मंतरवर निदर्शने करत ’24 लाख विद्यार्थ्यांना परीक्षा हव्या आहेत, घोटाळे नको’ अशा घोषणा दिल्या. आम्ही परीक्षेसाठी खूप मेहनत केली आणि आता आम्हाला आमच्या जागा हव्या आहेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. NEET चा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला.
NEET पेपर फुटल्याचा सरकारचा इन्कार NEET Exam Controversy ।
केंद्र सरकारने NEET UG परीक्षेतील पेपर फुटल्याच्या प्रकरणाचा इन्कार केला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आतापर्यंत NEET परीक्षेत कोणत्याही प्रकारची अनियमितता, भ्रष्टाचार किंवा पेपर फुटल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. यासंबंधीची सर्व वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयासमोर असून सध्या ती विचाराधीन आहे. या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले.





