दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या कार्यालयाची तोडफोड

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या कार्यालयात रविवारी पहाटे गोंधळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. या संघटनेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यात हाणामारी झाल्याचे सांगण्यात येत आहे. डीयूएसयूचे अध्यक्ष तुषार देधा हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) तर उपाध्यक्ष अभि दहिया हे एनएसयूआयचे आहेत.
दुसरीकडे अभाविपने या घटनेनंतर कार्यालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून अध्यक्ष आणि सचिवांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप करत पोलिसांकडून कारवाईची मागणी केली आहे. या घटनेची माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की, ही घटना काल रात्री घडली. अभाविप आणि एनएसयूआयच्या सदस्यांमध्ये कार्यालयात खडाजंगी झाली. कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
या प्रकरणात कोणालाही दुखापत झाली नाही. दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे की आमच्याकडे दोन्हीकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, पोलीस घटनास्थळी उपस्थित असलेल्या गार्डचा जबाब नोंदवला असून, निवेदनाच्या आधारे कायदेशीर कारवाई केली जाईल. दोन्ही बाजूंशीही संपर्क साधला जाणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.





