बंगळुरू – आयपीएल स्पर्धेदरम्यान दिल्ली कॅपिटल्स संघातील खेळाडूंना चोरांमुळे चांगलाच फटका बसला आहे. संघातील सहा खेळाडूंच्या तब्बल 16 बॅट, कीट, पॅड तसेच अन्य साहित्यांची चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धचा सामना संपल्यावर दिल्लाचा संघ दिल्लीत दाखल झाला तेव्हा ही बाब उघड झाली. या चोरीला गेलेल्या काही बॅटची किंमत लाखो रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. काही खेळाडूंच्या कीटमधून ग्लोव्हज, पॅड व अन्य काही साहित्यही चोरीला गेले आहे. दिल्लीचा स्टार खेळाडू डेव्हीड वॉर्नर, मिशेल मार्श, फिल सॉल्ट व यश धुल यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. त्यांचे महागडे साहित्य चोरीला गेले आहे. या संदर्भात दिल्ली संघ व्यवस्थापनाने तक्रार दाखल केली असून त्याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. अ शी घटना पहिल्यांदाच घडली असून लवकरच हे प्रकरण लॉजिस्टिक विभाग, पोलीस व नंतर विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहे. कोणताही सामना संपल्यावर अन्य शहरात खेळाडू दाखल होण्यापूर्वीच त्यांचे साहित्य तेथे पोहेचवले जाते. आता ज्या खेळाडूंच्या बॅट किंवा अन्य साहित्य चोरीला गेले आहे त्यांना परदेशातून पुन्हा हे सर्व इतक्या कमी वेळेत मागवणे शक्य होणार नसल्याने जे साहित्य भारतात उपलब्ध आहे त्याचाच वापर करून सराव करावा लागणार आहे.