– वंदना बर्वे 2026 हे वर्ष रोमांचक राजकीय घडामोडींनी भरलेलं राहण्याची शक्यता आहे. कारण, यंदा 4 राज्ये, 1 केंद्रशासित प्रदेश या विधानसभांची आणि राज्यसभेच्या 71 जागांसाठी निवडणूक होणे आहे. यंदा मागील वर्षापेक्षा जास्त राज्यांमध्ये निवडणुका होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये 294, केरळमध्ये 140, तामिळनाडत 234, आसाममध्ये 126 आणि केंद्राशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक होणे आहे. राज्यसभेबाबत बोलायचं झालं तर 2 एप्रिल रोजी 37 सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. 9 एप्रिल रोजी 15 आणि जून महिन्यात 22 खासदार निवृत्त होतील. 11 खासदारांचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपेल. यात माजी सरन्यायाधीश आणि नामनिर्देशित सदस्य रंजन गोगोई यांचाही समावेश आहे. पश्चिम बंगालमधील बसीरहाट लोकसभा जागा सध्या रिक्त आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार हाजी नुरुल इस्लाम यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. येथे लवकरच निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्याचप्रमाणे, विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा जागा भरण्यासाठी अनेक राज्यांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. यात गोव्यातील फोंडा, कर्नाटकातील बागलकोट, महाराष्ट्रातील राहुरी, मणिपूरमधील ताडूबी आणि नागालँडमधील कोरीडांग यांचा समावेश आहे. या ठिकाणी विधानसभेसोबतच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. 294 सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 7 मे 2026 रोजी संपत आहे. यामुळे येथे मार्च ते मे दरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 215 जागा जिंकल्या होत्या. तर 48 टक्के मतं मिळविली होती. भाजपाने 77 जागांवर विजय मिळवित दुसरे स्थान पटकाविले होते. मतांची टक्केवारी 38 एवढी होती. महत्त्वाचं म्हणजे, 2016 मध्ये भाजपचे फक्त तीन आमदार निवडून आले होते. 2021 मध्ये हा आकडा 77 वर पोहचला. ममतादीदी तब्ब्ल 15 वर्षांपासून सत्तेत आहेत. भाजपसाठी 2026 मध्ये 2021 मध्ये मिळालेले यश आणखी पुढे नेण्याचे आव्हान आहे. दीदी यांना केवळ भाजपचाच सामना करावा लागणार आहे असे अजिबात नाही. डावे पक्ष दीदीला पराभूत करण्यासाठी प्रयत्न करतील यात शंका नाही. मात्र, काँग्रेस पक्ष कोणती भूमिका घेतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. केरळ विधानसभेचा कार्यकाळ 23 मे 2026 रोजी संपत आहे. सध्या, सीपीआय(एम) नेतृत्वाखालील एलडीएफ आघाडीची राज्यात सत्ता आहे. 2021 च्या निवडणुकीत एलडीएफने 140 जागांपैकी 99 जागा जिंकून सलग दुसर्यांदा सत्ता मिळवली होती. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ)ला 41 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाने केरळमध्ये गेल्या दोन निवडणुका आक्रमकपणे लढवल्या, परंतु त्यांना खातेही उघडता आले नाही. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत यश मिळवित भाजपने झेंडा फडकविला आहे. आता एलडीएफ सलग तिसर्यांदा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. एलडीएफला पुन्हा सत्ता मिळाली तर तो एक मोठा विक्रम असेल. केरळच्या इतिहासात एलडीएफने कधीही सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकलेल्या नाहीत. मुख्यमंत्री पिनरयी विजयन ‘विकासासाठी सातत्य’ या थीमवर प्रचार करत आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ पुन्हा जागा मिळवण्याचा प्रयत्न करेल. केरळमध्ये अलीकडच्या नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी यूडीएफसाठी आशा निर्माण केल्या आहेत. तमिळनाडू विधानसभेचा कार्यकाळ 10 मे 2026 रोजी संपत आहे. सध्या येथे द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) सत्तेत आहे. 2021 मध्ये 234 सदस्यांच्या विधानसभेत द्रमुकचे 133 आमदार निवडून आले होते. आघाडीतील मित्र पक्षांना मिळालेल्या जागांमुळे सत्ताधारी पक्षाची सदस्य संख्या 156 वर पोहचली. भाजपने माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अन्नाद्रमुक पक्षासोबत युती केली आहे. 2021च्या निवडणुकीत युतीला 75 जागा मिळाल्या होत्या.यंदा तमिळ चित्रपट अभिनेता विजय यांचा टीव्हीके हा पक्षसुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. यामुळे द्रमुकसोबतच अन्नाद्रमुक-भाजप युतीला नवीन आव्हानाचा सामना करावा लागेल. सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी द्रमुकला आव्हानाचा सामना करावा लागेल. दरम्यान, जयललिता यांच्या निधनानंतर नामशेष झालेला अण्णाद्रमुक पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करेल. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी द्रमुक पक्ष इंडिया आघाडीचा भाग म्हणून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.एआयएडीएमके नेते पलानीस्वामी यांनी स्टॅलिनचा पुन्हा सत्तेत येण्याचा दावा फेटाळून लावला आहे. स्टॅलिन यांनी 200 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. परंतु, अन्नाद्रमुक भाजप युतीला 210 पेक्षा जास्त जागा मिळतील आणि युतीच सत्ता स्थापन करणार असा पलानीस्वामी यांचा दावा आहे. अभिनेता विजय यांच्या पक्षाचा तमिळनाडूच्या राजकारणात झालेला प्रवेश निवडणुकीचे समीकरण बदलू शकतो. ही निवडणूक टीव्हीकेसाठी एक महत्त्वपूर्ण राजकीय पदार्पण असेल. विजय यांनी या लढाईला टीव्हीके आणि डीएमके यांच्यातील लढाई घोषित केले आहे आणि स्वतःला स्टॅलिन यांचा पर्याय म्हणून सादर केले आहे. आसाम विधानसभेचा कार्यकाळ 20 मे 2026 रोजी संपत आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप युतीने आघाडीने राज्यातील 126 पैकी 75 जागा जिंकल्या होत्या. यातील 60 जागा एकट्या भाजपच्या होत्या. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीनेही 50 जागा जिंकल्या होत्या. यातील 28 काँग्रेसने आणि बद्रुद्दीन अजमल यांच्या एआययूडीएफने 16 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने आता खासदार गौरव गोगोई यांना पुढे केले आहे. थोडक्यात, मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा विरूद्ध गौरव गोगोई असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील रालोआपुढे राज्यातील सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान आहे. 10 वर्षांच्या राजवटीत निर्माण झालेला अँटी-इंकम्बन्सीमुळे नवीन संकटाचा सामना रालोआला करावा लागणार आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी आगामी निवडणुकीत 104 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. मात्र, अँटी-इंकम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता आहे. बद्रुद्दीन अजमल यांनी काँग्रेससोबतची आघाडी मोडून स्वबळावर निवडणूक लढवली, तर मतांचे विभाजन होऊ शकते आणि याचा थेट फायदा भाजपच्या झोळीत जाईल.