Delhi Services Bill : मोदी सरकारशी कुठलीही तडजोड नको – शरद पवार

नवी दिल्ली :- दिल्ली सेवा अध्यादेशाची जागा घेणाऱ्या विधेयकावर मोदी सरकारशी कुठलीही तडजोड होता कामा नये, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. त्यामुळे पवार यांनी भाजपशी जवळीक वाढल्याच्या चर्चांना तूर्त तरी पूर्णविराम दिल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पवार पुण्यात एकाच व्यासपीठावर एकत्र आले. पवार यांनी त्या सोहळ्यापासून दूर रहावे, अशी विरोधकांची आणि प्रामुख्याने कॉंग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटाची इच्छा होती. मात्र, पवार यांनी ती इच्छा पूर्ण केली नाही. तसे असले तरी, पवार पुढच्याच दिवशी दिल्लीतील विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी दिल्ली सेवा विधेयकाबाबत भूमिका स्पष्ट केली.
मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्या शिष्टमंडळातही पवार यांचा समावेश होता.
मणिपूर मुद्द्यावरून सध्या संसदेचे कामकाज ठप्प झाले आहे. ती कोंडी फोडण्यासाठी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. त्या बैठकीतही पवार उपस्थित होते. त्यातून विरोधकांच्या गोटातच असल्याचा संदेश त्यांनी पोहचवला.





