– वंदना बर्वे भाजप ‘केरळ’ला समोर ठेवून शशी थरूर यांना ओढण्यासाठी आतुर आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई झाली तर थरूर यांच्यासाठी पक्ष सोडून जाण्याचा बहाणा होऊ शकतो. भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवादी तळांवर हल्ला करून पहलगामचा हिशेब बरोबर केला. याशिवाय, पाक आर्मीच्या बेस कॅम्पलाही खूप मोठे नुकसान पोहचविले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे खंबीर नेतृत्व पाठिशी असल्यामुळे हे सर्व शक्य होऊ शकलं, असा प्रचार केंद्र सरकार आणि भाजपकडून केला जात आहे. यासाठी तिरंगा यात्राही काढण्यात आली. एवढंच नव्हे तर, 51 खासदारांचे सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ जवळपास 30 देशांमध्ये पाठविण्यात आले. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणणे आणि भारताने केलेली कारवाई ही स्वसंरक्षणार्थ होती हे पटवून देणे हा या शिष्टमंडळाच्या कार्याचा प्रमुख भाग होय. मात्र, शिष्टमंडळात सर्वपक्षांचे खासदार असले तरी त्यांची निवड एका पूर्ण योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आली असं म्हणावं लागेल. यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचा करता येईल. थरूर काँग्रेसचे खासदार आहेत हे सत्य असलं तरी त्यांच्या मनात काय चाललं आहे? थरूर कोणत्याही क्षणी भाजपात जाऊ शकतात अशी चर्चा आहे. थोडक्यात, थरूर भाजपसाठी केरळमध्ये खूप मोठी अॅसेट आहे. मात्र, महत्त्वाचा मुद्दा असा की, काँग्रेसला जे अजिबात नको आहे शशी थरूर तेच करत आहेत. यानंतरही काँग्रेसला त्यांच्यावर कारवाई करता आली नाही किंवा केली नाही. थरूर काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करीत नाही आहे काय? की आणखी काही दुसरे कारण आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई अजूनपर्यंत का झाली नाही, असे अनेक प्रश्न सध्या तरी अनेकांना पडले आहेत. सध्याच्या काळातील सर्वाधिक चर्चेत असलेले शशी थरूर केरळच्या तिरुअनंतपुरमहून काँग्रेसच्या तिकिटावर चार वेळा निवडून आले आहेत. आपले राजकीय चातुर्य वापरून त्यांनी हा विजय मिळविला आहे यात दुमत नाही. ते धाडसी आहेत. ते पक्षाच्या विरोधात जाऊन वेगळी भूमिका घेऊ शकतात. थरूर यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विरोधात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. यावरून त्यांच्या कामकाजाची पद्धत लक्षात येईल. केरळमधील एलडीएफ सरकारचे कौतुक त्यांनी केले. आता ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान मोदी आणि भाजपचा उदोउदो करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे शशी थरूर काँग्रेसला नकोसे झाले नसतील तरच नवल! काँग्रेसचे काही नेते सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका करताना दिसतात. यानंतरही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई न होणे विचार करायला लावणारी बाब आहे. एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती अशी की केरळ विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. अशात, थरूर यांच्यावर कारवाई केली तर निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात हे काँग्रेसला माहीत आहे. शशी थरूर हे केरळमध्ये काँग्रेसचा सर्वात महत्त्वाचा चेहरा आहेत. केरळच्या स्थानिक नेतृत्वाला थरूर आवडत नसले तरी ते केरळच्या मध्यमवर्गातील लोकप्रिय व्यक्ती आहेत हे मान्य करावे लागेल. त्यांना सर्व समुदाय आणि जातींचा पाठिंबा आहे. महिला मतदारांमध्येही त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. थरूर नायर समाजाचे नेतृत्व करतात. या समाजाची मोठी व्होटबँक आहे. अशात, थरूर यांना हात लावला तर या व्होटबँकेवर पाणी सोडण्यासाखे होईल. थरूर यांनी अल्पसंख्याक समुदायाला न दुखावता सबरीमाला मंदिर प्रवेशचा वादग्रस्त मुद्दा चातुर्याने हाताळला आणि समतोल साधला. थरूर यांचे डाव्या विचारसरणीशीही चांगले संबंध आहेत. तिरुअनंतपुरममधून सलग चौथ्यांदा निवडून येणे हा त्यांच्या लोकप्रियतेचा पुरावाच होय. केरळमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी शशी थरूर हे एक प्रभावशाली चेहरा असू शकतात. अशा परिस्थितीत, ही स्पर्धा पिनारायी विजयन विरुद्ध शशी थरूर अशी होईल. मुख्यमंत्री पिनारायी विजयन 10 वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. यामुळे त्यांच्याविरूद्ध सत्ताविरोधी लाट निर्माण झाली आहे. अशात, थरूर मुसंडी मारू शकतात. भाजपकडून या निवडणुकीत राजीव चंद्रशेखर यांना चेहरा बनविला जाण्याची दाट शक्यता आहे. थरूर हे राष्ट्रीय पातळीवर केरळमधून काँग्रेसचा सर्वात करिष्माई चेहरा असू शकतात. येथे असा युक्तिवाद देखील केला जाऊ शकतो की काँग्रेसकडे केरळमध्ये अनेक मजबूत नेते आहेत, परंतु थरूर ही अशी व्यक्ती आहे जी निवडणुकीत पक्षासाठी एक्स फॅक्टर बनू शकतात. काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर थरूर यांच्यासाठी समस्या प्रामुख्याने केरळच्या जुन्या नेत्यांची आहे. केसी वेणुगोपाल हे नेहमीच त्यांचे प्रतिस्पर्धी राहिले आहेत. थरूर यांच्या उदयामुळे केरळमधील पक्षाच्या जुन्या नेत्यांना धोका जाणवत आहे. परंतु थरूर यांना हटवल्याने भाजपला कोणत्याही प्रयत्नाशिवाय असा मुद्दा मिळेल की काँग्रेसमध्ये गुणवत्तेचा आदर केला जात नाही. हे खरे आहे की काँग्रेसमध्ये अनेक तळागाळातील नेते आहेत जे थरूर यांना पचवू शकत नाहीत, ते कदाचित त्या शक्तिशाली लॉबीमध्ये सर्वात लोकप्रिय नसतील. पण देशांतर्गत राजकारण बाजूला ठेवून, थरूर यांनी या टप्प्यावर राष्ट्रीय पातळीवर काहीही चुकीचे केलेले नाही. त्यांनी भारताचा संदेश जगाला दिला आहे. लोक त्यांचा आदर करतात. भाजप ‘थरूर ढाल’चा वापर एका प्रकारे करत आहे कारण ते एक मजबूत कवच आहे. काँग्रेसने त्यांच्याविरुद्ध केलेली कोणतीही कारवाई केली तर थरूर भाजपसाठी मिसाइलसारखे सिद्ध होतील. त्यांच्यावर होणारी वैयक्तिक टीका नियंत्रणात आणता येत नाही, परंतु पक्षाच्या त्यांच्या पाठिंब्याचा संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरू शकतो, विशेषतः जेव्हा पक्ष केरळमध्ये एक महत्त्वाची निवडणूक लढणार आहे. आता काँग्रेसने थरूर यांना आलिंगन देण्याची वेळ आली आहे. दुसरे म्हणजे, काँग्रेसने थरूर यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप देव पाण्यात घालून बसला आहे. काँग्रेसने परदेशात जाऊन पाकिस्तानच्या दहशतवादाचा बुरखा फाडला म्हणून काँग्रेसने थरूर यांच्यावर कारवाई केली असा प्रचार करण्याची संधी भाजपला हवी आहे. यासाठी काँग्रेसने थरूर यांच्यावर कारवाई करणे किंवा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा असे भाजपला वाटत आहे. मात्र, काँग्रेस भाजपला हे सुख मिळू देणार नाही, असे सध्या दिसून येत आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची भाजपची परंपरा नाही. आतापर्यंतच्या सर्व निवडणुका केंद्रीय नेतृत्वाच्या चेहर्यावर लढविण्यात आल्या आहेत. पण, थरूर यांना चार भिंतींच्या आत गाजर दाखविले जाऊ शकते. यात मुख्यमंत्रिपदही असू शकते किंवा केंद्रात मंत्रिपदही असू शकते. परंतु, ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे केरळसह पाचही राज्यांतील सोपा झालेल्या विजयावर एअरफोर्स प्रमुख आणि चीफ ऑफ डिफेंस स्टाफच्या विधानाने विरजण सोडले, यात शंका नाही!