– वंदना बर्वे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या काळात प्रचारही आलाच. मात्र, आता देशात निवडणुकीशिवाय दुसरं काहीच नाही असं दिसून येते. निवडणूक महाराष्ट्र आणि झारखंडची असली तरी तयारी दिल्ली, बिहार, यूपीसह कितीतरी राज्यांत सुरू आहे. महाराष्ट्र आणि झारखंडसह 14 राज्यांतील विधानसभा पोट निवडणुका आणि लोकसभेच्या दोन जागांवरील निवडणुकीचा निकाल लागणार आहे. हे निकाल त्यातही महाराष्ट्राचे निकाल आगामी काळात विविध राज्यांत होणार्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकणारा आहे. यामुळे भाजप पूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्रात उतरला आहे. हरियाणा निवडणुकीच्या निकालामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. या निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये करण्याची त्यांची योजना आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना, गायीला दिलेला राज्यमाताचा दर्जा, लव्ह जिहाद यासारख्या मुद्द्यांच्या माध्यमातून वातावरण बनविले जात आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीनंतर दिल्ली, बिहार, यूपी अशा कितीतरी राज्यांमध्ये सलग निवडणुका होणार आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा दिली आहे. मुळात ही घोषणा म्हणजे लिटमस टेस्ट होय. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ही घोषणा चालली तर देशातील उर्वरित राज्यांतही ही घोषणा कमाल दाखविल्याशिवाय राहणार नाही, याची जाणीव भाजपला आहे. थोडक्यात, योगी आदित्यनाथ हे 2027 मध्ये उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्माण करण्याचे काम करीत आहे. महाराष्ट्रातील मतदार त्यास कशाप्रकारे उत्तर देतो हे पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 11.24 कोटी असून त्यापैकी 1.3 कोटी मुस्लीम आहेत. राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 35 अशा जागा आहेत जिथे मुस्लीम लोकसंख्या 20 टक्क्याच्या आसपास आहे. आठ-नऊ विधानसभांमध्ये याहीपेक्षा जास्त आहे. मात्र, निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या मुस्लीम उमेदवारांची संख्या फारच कमी आहे. काँग्रेसने आठ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चार जणांना उमेदवारी दिली आहे. वंचितने मुस्लीम उमेदवारांना अधिक तिकटे दिली आहेत. यात किंचितही दुमत नाही की महाराष्ट्राचा निकाल दिल्ली, बिहार आणि यूपीसह अन्य राज्यांत होणार्या निवडणुकीला प्रभावित करणारा राहणारा आहे. यातही भाजपचा फोकस आहे तो उत्तरप्रदेशवर. कारण तेथे लोकसभेच्या 80 जागा आहेत. 2029 मधील लोकसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून सर्व डावपेच आखले जात आहेत. योगी केवळ महाराष्ट्राचेच वातावरण तापवित आहेत असं अजिबात नव्हे. उत्तरप्रदेशातील विधानसभांच्या जागांवर होत असलेल्या पोटनिवडणुकीचा प्रचार करतानाही ते समाजवादी पक्षाला धारेवर धरत आहेत. योगी आदित्यनाथ सध्या हिंदुत्वाच्या नावाखाली समाजवादी पक्षाला फक्त कोंडीत पकडत नाही आहेत, तर माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारच्या काळात यूपीत माजलेली अराजकता, जंगलराज आणि दंगलींचीही आठवणही जनतेला करून देत आहेत. थोडक्यात, योगी आदित्यनाथ यांच्याकडून अखिलेश यादव यांची चौफेर कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप आणि योगींची ही रणनीती यशस्वी ठरली तर पोटनिवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला तर होईलच पण 2027 मध्ये होणार्या यूपी विधानसभेच्या निवडणुकीची जमिनही तयार होणार आहे. दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्याचे दुःख भाजपला अजूनही त्रास देत आहे. पोटनिवडणुकीचे निकाल म्हणजे त्यावर मलम लावण्यासारखे होईल. आंबेडकर नगरच्या काटेहरी, मिर्झापूरच्या माळवण आणि फुलपूरच्या प्रयागराज किंवा अन्य विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित सभेत योगींनी समाजवादी पक्षाला अनेक दूषणे दिली. समाजवादी पक्षाने ‘पीडीए’ची घोषणा दिली आहे. या पीडीएचा अर्थ योगीजींनी आपल्या हिशेबाने लावला आहे. त्यांच्यामते पीडीए म्हणजे ‘प्रॉडक्शन हाउस ऑफ दंगाई अँड अपराधी’ असा होय. योगी ‘बटेंगे तो कटेंग’ आणि ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ या घोषणेचा वारंवार उच्चार करून मतदारांना एकजूट राहण्याचा सल्ला देत आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यामते, एससी-एसटीवर सर्वाधिक अत्याचार सपा राजवटीत झाले. 2015-16 मध्ये या लोकांनी एससी-एसटी मुलांची शिष्यवृत्ती बंद केली होती. भाजपने ती सुरू केली. काँग्रेस आणि सपा यांची आघाडी देश आणि समाजासाठी घातक आहे. त्यामुळे हरियाणातील जनतेने आघाडीला पराभूत केले आणि भाजपची हॅट्ट्रिक केली. प्रयागराजच्या फुलपूर आणि मिर्झापूर मतदारसंघात पक्षाचा प्रचार करतानाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्ष आणि अखिलेश यादव यांच्यावरच तोफ डागली. याच कारणामुळे योगी देशाचे स्टार प्रचारक म्हणून पुढे आले आहे आणि त्यांची डिमांड खूप वाढली आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत सलग तीन दिवस नऊ सभा घेतल्या. त्यांनी झारखंडमध्ये अनेक सभा घेऊन भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता. भवनाथपूर, पलामू जिल्ह्यातील हुसैनाबाद, पाणकी अशा विविध मतदारसंघात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चौथी आणि शेवटची सभा डाल्टनगंज विधानसभा मतदारसंघाची आहे. अशातच योगींनी सपाला गुंतवण्यासाठी जाळं फेकलं आहे. अखिलेश यादव त्यात अडकतात की नाही? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.