नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत गुन्हेगारीची अशी एक घटना समोर आली आहे, जी ऐकल्यानंतर धक्का बसणार येथील शाहदरा परिसरात अवघ्या 10 हजार रुपयांसाठी मित्राने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रोहन असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहन हा बिहारमधील किशनगंजचा रहिवासी होता. त्याचा दिल्लीत मोमोज विकण्याचा व्यवसाय होता तर नूर मोहम्मद असे आरोपी मित्राचे नाव आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
14 मार्च रोजी पोलिसांना अल कुरेशी मशिदीजवळील सदर बाजारमध्ये दुसऱ्या मजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची बातमी मिळाली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तपास करण्यास सुरुवात केली तेव्हा सदर बाजारचे एसएचओ कन्हैया लाल यादव यांनी सांगितले की, हे हत्येचे प्रकरण आहे.
त्यामुळे दिल्ली पोलिसांनी परिसरातील 26 सीसीटीव्ही फुटेजची छाननी केली. पोलिसांनी परिसरातील लोकांची चौकशी केली आणि फुटेजच्या आधारे रोहनचा मित्र नूर मोहम्मद याला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत नूर मोहम्मदने खुलासा केला की, ते दोन्ही मित्र खोलीत बसले होते, तर रोहन त्याच्या आईशी 10 हजार रुपये घरी पाठवण्यासाठी बोलत होता. रोहनकडे 10 हजार असल्याचे बघून ते मिळवण्यासाठी नूरने रोहणची हत्या केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.