Free Bus Travel : दिल्ली सरकारने तृतीयपंथी समुदायासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सरकारी बसमध्ये तृतीयपंथींना मोफत प्रवास देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर दिल्लीत राहणाऱ्या तृतीयपंथींना आता सरकारी बसमधून विनामूल्य प्रवास करता येणार आहे. सरकारने हा निर्णय दिल्ली परिवहन महामंडळ आणि परिवहन विभागाच्या बसेसमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना दिल्या जाणाऱ्या मोफत बस प्रवासाच्या धर्तीवरच ही सुविधा तृतीयपंथी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सरकारच्या मते, या निर्णयाचा मुख्य उद्देश तृतीयपंथी समुदायाला सुरक्षित, सुलभ आणि परवडणारा प्रवास उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे त्यांना नोकरी, व्यवसाय किंवा दैनंदिन कामांसाठी प्रवास करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. याबाबत बोलताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, आमच्या सरकारचे ध्येय अशी दिल्ली घडवण्याचे आहे जिथे प्रत्येक नागरिकाला सन्मानाने संधी आणि सार्वजनिक सेवा समानपणे मिळतील. या निर्णयामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये समता आणि सामाजिक सलोखा वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत होत असून तृतीयपंथी समुदायासाठी हा निर्णय दिल्लीत मोठा दिलासा मानला जात आहे.