दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री अतिशींचे कामगारांना मोठे गिफ्ट; किमान वेतन वाढवले, कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण

नवी दिल्ली – दिवाळीपूर्वी दिल्ली सरकारने लाखो कामगार आणि कर्मचाऱ्यांना भेट दिली आहे. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री अतिशी यांनी कामगारांचे किमान वेतन वाढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता अकुशल कामगारांचे किमान वेतन 18066 रुपये झाले आहे, जे पूर्वी 17494 रुपये होते. अर्ध-कुशल कामगारांसाठी किमान वेतन आता 19,929 रुपये झाले, जे पूर्वी 19,279 रुपये होते. त्याचप्रमाणे कुशल कामगारांचे किमान वेतन 21,917 रुपये झाले आहे जे पूर्वी 21,215 रुपये होते.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, देशभरातील किमान वेतन बघायला गेले तर अरविंद केजरीवाल यांच्या सरकारच्या काळात देशात सर्वाधिक किमान वेतन देण्यात आले आहे. गरीब लोकांचे शोषण थांबवण्यासाठी दिल्ली सरकारने ऐतिहासिक पातळीवर किमान वेतन निश्चित केले आहे. भाजपने नेहमीच गरीब विरोधी काम केले आहे आणि ते आपण दोन प्रकारे पाहू शकतो.
अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने 2016-2017 मध्ये किमान वेतन वाढवण्याबाबत पहिल्यांदाच चर्चा केली तेव्हा भाजपने आपल्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून आम्हाला रोखले. त्यानंतर दिल्ली सरकारने न्यायालयाकडून किमान वेतनात वाढ करण्याचा आदेश आणला. याला भाजपने कडाडून विरोध केला.
नेहमीप्रमाणेच अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने जोरदार लढा देत दिल्लीतील सामान्य जनतेच्या बाजूने निर्णय आणला. भाजपशासित राज्यांवर नजर टाकली तर तिथले किमान वेतन दिल्लीत आहे त्यापेक्षा निम्मे असेल. भाजप आपल्या राज्यांत कमी वेतन तर देतेच पण दिल्लीतही ते रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.





