Delhi Earthquake : दिल्लीत आज (17 फेब्रुवारी) पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ही रिश्टर स्केल 4 इतकी मोजली गेली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरून घराबाहेर पडले. भूकंपाचे केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून फक्त 5 किमी खाली होते. भूकंपानंतर नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून ते NCR मधील उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोकांच्या घरांमधील पंखे जोरात हलू लागले आणि घरातील भांडी देखील खाली पडली. अचानक आलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. भुकंप आल्यावर काय करू नये व कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी, त्याविषयी जाणून घेऊया. भूकंप आल्यावर काय करू नये व काय काळजी घ्यावी? घाबरून पळू नका – भूकंपचे धक्के जाणवल्यास घाबरून घाईघाईने इकडे तिकडे पळू नये. शांत राहून सुरक्षित जागा शोधायला हवी. लिफ्टचा वापर करू नका – अशा स्थितीमध्ये लिफ्टचा वापर करू नये. त्याऐवजी जिना वापरा. लिफ्ट बंद पडू शकते किंवा अडकण्याचा धोका असतो. ताबडतोब बाहेर जाऊ नका – भूकंप आल्यानंतर त्वरित घराबाहेर धावू नका. बाहेर पडताना छप्पर, भिंत किंवा झाडे कोसळण्याची शकते असते. तुम्ही जर घरात असाल तर अशावेळी टेबल किंवा मजबूत फर्निचरखाली आसरा घ्यावा. दरवाजा, खिडकी, भिंतीपासून लांब राहावे. तसेच, भूकंपाचे धक्के कमी झाल्यानंतर तुम्ही मैदानासारख्या मोकळ्या जागी जावू शकता. अशा स्थितीमध्ये मैदानासारखी जागा सर्वाधिक सुरक्षित असते. लाईट किंवा गॅस सुरू करू नका – गॅस गळती किंवा वीज शॉर्टसर्किटमुळे आग लागू शकते, त्यामुळे अशा स्थितीमध्ये लाइट सुरू करू नये. गॅस उपकरणांना हात लावू नका. तसेच, दुखापत झाली असल्यास त्वरित डॉक्टरांची मदत घ्यावी. स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. भूकंप होण्याची कारणं काय असू शकतात? भूकंप होण्याची कारणं मानवी आणि नैसर्गिक दोन्ही असू शकतात. मात्र, ही प्रामुख्याने नैसर्गिक घटना असते. पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या हालचालींमुळे ही घटना घडते. पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली मोठ्या टेक्टॉनिक प्लेट्स असतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांना धडकतात, घसरण होते किंवा ताण निर्माण होतो, तेव्हा अचानक ऊर्जा बाहेर पडते आणि जमिनीवर जोरदार हादरे बसतात. याशिवाय, खाणकाम किंवा मोठे स्फोट यामुळे देखील भूकंपाची शक्यता निर्माण होते.