– वंदना बर्वे Election : आता पाच राज्यांची निवडणूक (Election) लढाई आहे. भाजप आणि विरोधी पक्षांच्या निवडणूक लढाईत कोण जिंकतं यावर राजकारणाची आगामी दिशा ठरणार आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी येथील निवडणुका (Election) या अन्य राज्यांच्या निवडणुकांप्रमाणे नाहीत. ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रत्येक राज्यांतील नेतृत्वासोबत होणार आहे. पाचही राज्यांमध्ये काँग्रेसचे फारसे अस्तित्व नसल्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रभावाची चर्चा यावेळेस होण्याची शक्यता कमी आहे. पश्चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी यांचा सामना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी होणे आहे. तामिळनाडूत हा सामना मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्यासोबत होईल. केरळमध्ये भाजपचा सामना डाव्या पक्षाशी होणे आहे. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये रालोआचेच सरकार आहे. पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांपुढे स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे. या निवडणुकीत डाव्या पक्षांचे पुनरागम नाही झाले किंवा चांगले म्हणावे असे यश नाही मिळाले तर डावे पक्ष इतिहासात जमा होण्याच्या दिशेने वाटचाल करतील. यामुळे डावे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचे बघायला मिळणार आहे. भाजपाला या पाचही राज्यांमध्ये आपला विस्तार करायचा आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ ही अशी राज्ये आहेत जिथे भाजपला आतापर्यंत सत्ता सोडा थोडेफारसुद्धा यश मिळालेले नाही. अशात, भाजप यावेळी पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार यात शंका नाही. Lok Sabha Elections Date। भाजपला आपल्या राजकीय अस्तित्वाचा विस्तार करायचा आहे आणि तमाम विरोधी पक्षांना भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडायचा आहे. किंबहुना, भाजपला थांबविण्यात अपयशी ठरले तर विरोधी पक्षांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाली होती. हे खरे असले तरी लोकसभेनंतर ज्या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात भाजपने मुसंडी मारली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षांची कामगिरी चांगली होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, विरोधी पक्षांना फार काही चांगले करता आले नाही. या निवडणुकांची घोषणा अशा वेळी झाली आहे जेव्हा विरोधी पक्षांच्या हातात सरकारच्या विरोधात अनेक मुद्दे लागले आहेत आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची विधाने, भारत अमेरिका व्यापार करार, इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्ध आणि त्यामुळे निर्माण झालेला इंधनाचा प्रश्न, मतदार याद्यांची विशेष पुनर्रचना असे कितीतरी मुद्दे विरोधकांच्या हातात आहेत. अशात, या निवडणुका जनतेच्या खर्या राजकीय मनःस्थितीची एक परीक्षा म्हणूनही पाहिल्या जात आहेत. भाजपला आसाम जिंकण्याचा पूर्ण आत्मविश्वास आहे. याच आत्मविश्वासाने सत्ताधारी पक्ष मैदानात उतरणार आहे. 2016 पासून राज्यात भाजपची सत्ता आहे आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वात भाजपची स्थिती मजबूत असल्याचे भाजपला वाटत आहे. भाजपने बांगलादेशातून होणारी घुसखोरी आणि स्थानिक अस्मितेचे मुद्दे निवडणुकीच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आणून निवडणुकीचे वातावरण अधिकच तापवले आहे. केरळमधील निवडणुका विशेषतः महत्त्वपूर्ण आहेत. कारण पारंपरिकरित्या डावी लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी हे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत. मागील निवडणुकीत जवळपास 17 टक्के मते मिळवल्यानंतर भाजपला आता येथे एक महत्त्वपूर्ण शक्ती म्हणून पाहिले जात आहे. ही निवडणूक डाव्या पक्षांसमोर आपला शेवटचा बालेकिल्ला टिकवून ठेवण्याची संधी आहे असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करत या सर्व राज्यांमध्ये वारंवार दौरे आणि सभा घेत आहेत. त्यांनी विशेषतः पश्चिम बंगालमध्ये आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. भाजपचा दावा आहे की घुसखोरी आणि धार्मिक अस्मितेशी संबंधित मुद्द्यांमुळे पश्चिम बंगालमध्ये व्यापक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी 2011 पासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदी आहेत. त्यांनी डाव्यांची सत्ता उधळून लावत हा विजय मिळविला होता आणि तो आतापर्यंत टिकवूनही ठेवला. आता दीदीपुढे भाजपचे आव्हान आहे आणि त्यांनी भाजपचे आव्हान यशस्वीपणे परतवूनही लावले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 18 जागा जिंकून एक महत्त्वपूर्ण राजकीय संदेश दिला. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये भाजपचा मतांचा टक्का 38 ते 39 टक्क्यांच्या दरम्यान स्थिर राहिला आहे. यामुळे पक्षाला आशा आहे की यावेळी ते ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात लक्षणीय शिरकाव करू शकतील. या निवडणुका काँग्रेससाठीसुद्धा एका लिटमस टेस्ट सारखीच आहे. 2014पासून राष्ट्रीय राजकारणात सातत्याने कमकुवत झाल्यानंतर काँग्रेस आता या निवडणुकांच्या माध्यमातून आपले राजकीय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. पक्षाला आशा आहे की केरळमधील विजयामुळे नवीन राजकीय ऊर्जा येऊ शकेल. आसाममध्ये काँग्रेसने गौरव गोगोई यांच्यासारख्या तुलनेने तरुण नेत्याला पुढे करून एक नवीन रणनीती अवलंबली आहे. आसाम हा भाजपचा संपूर्ण बालेकिल्ला बनला आहे ही धारणा मोडून काढण्याइतकी चांगली कामगिरी करण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. तामिळनाडूमध्ये, काँग्रेसने डीएमकेसोबत युती केली असली तरी जागावाटपावरून सुरुवातीला मतभेद निर्माण झाले होते. अभिनेता विजयच्या नवीन पक्षाच्या उदयानंतर निवडणुकीचे समीकरण आणखी गुंतागुंतीचे झाले असून तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. एकंदरीत, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमधील निवडणुका केवळ प्रादेशिक सत्तेसाठीच्या लढती नाहीत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा राजकीय विस्तार सुरू राहील की राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष एक नवीन राजकीय संतुलन साधू शकेल हेदेखील या निवडणुकांमधून (Election) दिसून येईल. यात शंका नाही की या निवडणुका येत्या काही महिन्यांत भारतीय राजकारणातील सर्वात तीव्र लढतींपैकी एक ठरू शकतात.