नवी दिल्ली: भारताच्या राजधानीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ काल सायंकाळी झालेल्या भीषण कार स्फोटाने केवळ दिल्लीच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. या घटनेनंतर तपास यंत्रणांनी तातडीने सूत्रे हलवत, स्फोटात वापरलेल्या पांढऱ्या i20 कारच्या अवशेषांवरून तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या काही तासांतच या ‘टेरर कार’चे गूढ आणि तिचे दहशतवादी कनेक्शन उलगडले. स्फोट झालेल्या HR26CE7674 या नोंदणी क्रमांकाच्या कारने गुरुग्राम ते थेट जम्मू-काश्मीरमधील पुलवामापर्यंतचा प्रवास केला होता, ज्यामुळे या कटामागील आंतरराज्यीय आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय कटाची भीती वाढली आहे. तपासानुसार, २०१३ मध्ये तयार झालेल्या आणि २०१४ मध्ये सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या या कारची मालकी कागदोपत्री न बदलता अनेकदा बदलली गेली. गुरुग्राममधील सलमानने ही कार ओखला येथील देवेंद्रला विकली, देवेंद्रने अंबाला येथील एका व्यक्तीला, आणि अंबालाच्या त्या व्यक्तीने ती पुलवामा, जम्मू-काश्मीर येथील आमिरकडे हस्तांतरित केली. अखेरीस, ही कार फरीदाबादच्या अल-फलाह युनिव्हर्सिटीत कार्यरत असलेल्या डॉ. उमर मोहम्मदपर्यंत पोहोचली. या ‘अदृश्य हस्तांतरणा’मुळे ही कार अनेक राज्यांत फिरत राहिली, मात्र कागदोपत्री मालक सलमानच राहिला. जुन्या गाड्यांच्या बाजारपेठेतील ‘नोंदणी न बदलता व्यवहार’ करण्याच्या या सामान्य प्रथेचा फायदा कसा गुन्हेगारी घटक घेतात, याचे हे अत्यंत धोकादायक उदाहरण समोर आले आहे. या भीषण स्फोटामागील ‘डेथ राईड’चा घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजमुळे स्पष्ट झाला आहे. फरीदाबादमधून निघालेली ही कार बदरपूर बॉर्डरमार्गे दिल्लीत दाखल झाली. त्यानंतर ती सराय काले खां, व्यस्त ITO चौकातून मार्गक्रमण करत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील एका पार्किंगमध्ये पोहोचली. दुपारी ३ वाजून १९ मिनिटांनी पार्किंगमध्ये दाखल झालेला चालक पुढील तीन तास गाडीतून बाहेर पडला नाही. सायंकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी कार पार्किंगमधून बाहेर पडली आणि ६ वाजून ५२ मिनिटांनी नेताजी सुभाष मार्गावरील ट्रॅफिक सिग्नलजवळ तिचा भीषण स्फोट झाला. या कारच्या प्रवासाचे आणि मालकीच्या साखळीचे हे रहस्य उघड झाल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणा दहशतवादाचे मूळ आणि हे षडयंत्र रचणाऱ्या सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर तपास करत आहेत.