नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केली आहे. या चौघांना पटियाला हाऊस कोर्टासमोर हजर केले असता १० दिवसांच्या एनआयए कोठडीत पाठवण्यात आले. या चारही आरोपींना एनआयएने श्रीनगरमधून ताब्यात घेतले होते. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची एकूण संख्या सहावर पोहोचली आहे. डॉ. मुझम्मिल शकील गनई, डॉ. अदील अहमद राथेर, डॉ. शाहीन सईद आणि मुफ्ती इरफान अहमद वागे अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांनी दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दिल्ली स्फोट प्रकरणात आमिर रशीद अलीला पहिली अटक करण्यात आली होती. त्यानंतर काश्मीरमधील जसीर बिलाल वाणी उर्फ दानिशला चौकशीनंतर अटक करण्यात आले. या दोघांनीही उमर उन नबी या आत्मघातकी बॉम्बरला मदत केली होती. यानंतर गुरुवारी उमरला दहशतवादी हल्ला करण्यास मदत करणाऱ्या आणखी चार जणांना एनआयएने अटक केली आहे.