नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील स्फोटावरून आता विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याचे सत्र आरंभले आहे. कॉंग्रेसने स्फोट प्रकरणी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. तसेच, यावेळी बैठकीसाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित रहावे, अशी आग्रही भूमिकाही घेतली आहे. कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही लक्ष्य केले. दिल्लीतील स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे केंद्रीय मंत्रिमंडळाने जाहीर केले. चकित करणारी बाब म्हणजे स्फोटानंतर ४८ तासांनी तसे स्पष्ट करण्यात आले. दहशतवादी हल्ल्यांच्या प्रसंगी आम्ही नेहमीच सरकारच्या पाठिशी उभे राहिलो. मात्र, प्रश्न विचारणे हे आमचे कर्तव्य आहे. ताजा दहशतवादी हल्ला हे कुणाचे अपयश आहे? अपयशाची जबाबदारी कोण स्वीकारणार? देशात विविध दहशतवादी हल्ले घडले. शहा जबाबदारी स्वीकारणार का? देशात गुप्तचर यंत्रणा आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल बारकाईने देखरेख ठेऊन आहेत. तसे असूनही २ हजार ९०० किलो स्फोटके कशी आली, अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली. केंद्रात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना मुंबईत दहशतवादी हल्ला घडला. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राजीनामा दिला, याची आठवणही खेडा यांनी करून दिली. काही महिन्यांपूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ला घडला. तशा हल्ल्याला युद्धाचे कृत्य मानण्याची भूमिका सरकारने मांडली. त्या भूमिकेवर सरकार ठाम आहे का ते आम्ही जाणून घेऊ इच्छितो. त्यामुळे सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी असे आम्हाला वाटते. ती बैठक मोदींच्या अध्यक्षतेखाली व्हावी. संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दिल्ली स्फोटावर चर्चा करण्यासाठी त्या अधिवेशनाचा प्रारंभ त्याआधीच व्हावा, अशा मागण्याही त्यांनी केल्या.