ई-सायकलवर सबसिडी देणारं दिल्ली ठरलं देशातील पहिल राज्य

नवी दिल्ली – प्रदुषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने आता ई-सायकलवर सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत दिल्लीच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. प्रदूषणाविरुद्धच्या लढ्यात आज आपण आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलत आहोत. दिल्ली सरकारचे अत्यंत यशस्वी ई-वाहन अनुदान धोरण ई-सायकलपर्यंत विस्तारित केले जात आहे. ई-सायकलमुळे दिल्लीकरांना प्रदूषण करणाऱ्या वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत म्हणाले की, ई-सायकलवर सबसिडी देणारे दिल्ली हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आतापर्यंत देशातील कोणत्याही राज्याने आपल्या धोरणात ई-सायकलचा समावेश केला नसल्याची माहिती कैलाश गेहलोत यांनी दिली.
केजरीवाल सरकार पहिल्या 10,000 ई-सायकलच्या विक्रीवर प्रति ई-सायकल 5,500 रुपये सबसिडी देणार आहे. यापैकी, आधी खरेदी केलेल्या 1000 ई-सायकलवर 2,000 रुपयांचे अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल.
त्याचबरोबर मालवाहतुकीसाठी यापूर्वी खरेदी केलेल्या 5 हजार ई-सायकलवर 15-15 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. ई-कार्ट खरेदी करताना व्यक्तीच्या नावावर सबसिडी दिली जात होती. मात्र आता कंपनीलाही 30 हजार रुपयांची सबसिडी दिली जाणार आहे.





