सीलमपूर ते मुस्तफाबादपर्यंत ज्या ठिकाणी दंगली झाल्या त्या ठिकाणांच्या निकालाचा ट्रेंड काय? वाचा

Delhi Assembly Election Result । २०२० मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीत दंगल उसळली होती. राजधानीच्या काही भागात अनेक दिवस तोडफोड आणि जाळपोळ सुरूच होती. या दंगलीचा परिणाम दिल्लीतील सहा विधानसभा जागांवर झाला. यावेळी विधानसभा निवडणुकीत या सर्व ६ जागांवर चांगले मतदान झाले.याठिकाणी मतदानाची टक्केवारी ६० ते ७० टक्क्यांच्या दरम्यान होती. सुरुवातीच्या कलांमध्ये, भाजप या सहा जागांपैकी चार जागांवर आघाडीवर आहे.
भाजपला चार जागांवर चांगली आघाडी Delhi Assembly Election Result ।
घोंडा येथून भाजपकडून अजय महावार निवडणूक रिंगणात आहेत. ते आम आदमी पक्षाच्या गौरव शर्मा यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याठिकणी मतमोजणीच्या १५ फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीनंतर अजय महावार ३०१८ मतांनी आघाडीवर आहेत.
करावल नगरमध्ये भाजपने कपिल मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे, जे एकेकाळी आम आदमी पक्षाचे नेते होते. या जागेवर कपिल आघाडीवर आहेत. ते आपचे उमेदवार मनोज कुमार त्यागी यांच्यापेक्षा ६४७० मतांनी पुढे आहेत. सध्या, येथे २४ पैकी फक्त दोन फेऱ्या मोजल्या गेल्या आहेत.
गोकलपूरमध्येही भाजप उमेदवार आघाडीवर आहे. येथे भाजपने प्रवीण निमिष यांना उमेदवारी दिली आहे, तर आम आदमी पक्षाकडून सुरेंद्र कुमार उमेदवार आहेत. येथे मतमोजणीच्या २२ फेऱ्या होणार आहेत आणि पहिल्या दोन फेऱ्यांनंतर, प्रवीण १४१९ मतांनी आघाडीवर आहेत.
मुस्तफाबादमध्येही आम आदमी पक्ष मागे आहे. भाजप उमेदवार मोहन सिंग बिष्ट यांनी येथे आप उमेदवार आदिल अहमद खान यांच्यावर ११,३१५ मतांची आघाडी घेतली आहे. येथे मतमोजणीच्या २० फेऱ्या करायच्या आहेत आणि आतापर्यंत फक्त दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.
या दोन्ही जागांवर आम आदमी पक्ष आघाडीवर Delhi Assembly Election Result ।
बाबरपूरमध्ये आम आदमी पक्षाचे गोपाल राय उमेदवार आहेत. ते भाजपचे अनिल कुमार वशिष्ठ यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. याठिकाणी मतमोजणीच्या १९ फेऱ्या होणार आहेत. दोन फेऱ्यांनंतर, आपचे उमेदवार गोपाल राय ५६०२ मतांनी पुढे आहेत.
सीलमपूरमध्ये आम आदमी पक्षाचे उमेदवार चौधरी जुबैर अहमद खूपच कमी फरकाने आघाडीवर आहेत. येथे मतमोजणीच्या १९ फेऱ्या होणार आहेत आणि पहिल्या दोन फेऱ्यांनंतर, झुबेर यांनी भाजप उमेदवार अनिल कुमार शर्मा यांच्यावर ७८२ मतांची आघाडी घेतली आहे.
दंगलग्रस्त जागांवर मतदानाची टक्केवारी किती होती?
२०२५ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्तफाबाद येथे ६९ टक्के, सीलमपूर येथे ६८.७० टक्के, गोकुळपुरी येथे ६८.३ टक्के, बाबरपूर येथे ६६ टक्के, घोंडा येथे ६१.०३ टक्के आणि करावल नगर मतदारसंघात ६४.४४ टक्के मतदान झाले.





