Delhi assembly election: दिल्ली विधानसभा निवडणूकीचा बिगुल वाजला; आपची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली – महाराष्ट्रातील मतदार बुधवारी पार पडले असून अद्याप निकालही जाहीर व्ह्यायचा आहे. अशातच दिल्लीमध्ये निवडणूकीचा बिगुल वाजला. आम आदमी पक्षाने निवडणुकीसाठी पहिली उमेदवाराच्या नावाची यादी जाहीर केली. यात बहुतांश उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत 11 नावे आहेत. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पक्षातील निष्ठावंतांना डावलून 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यातील सहा उमेदवार भाजप आणि कॉग्रेसमधून आले आहेत, हे येथे उल्लेखनीय. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप केलेली नाही. परंतु, भाजप आणि कॉग्रेसच्या तुलनेत आप पुढे असल्याचे दाखविण्याकरिता केजरीवाल यांनी ही यादी जाहीर केली आहे.
आपच्या 11 उमेदवारांमध्ये ब्रह्मसिंह तंवर (छतरपूर), बीबी त्यागी (लक्ष्मीनगर) आणि अनिल झा (किराडी), झुबेर चौधरी (सीलमपूर), वीरसिंग धिंगाण (सीमापुरी), सुमेश शौकीन (मटियाला), दीपक सिंघला (विश्वासनगर), सरिता सिंग (रोहतास नगर), रामसिंग नेता (बदरपूर), गौरव शर्मा (घोंडा) आणि मनोज त्यागी (करावलनगर) यांचा समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे, ब्रह्मसिंह तंवर, बीबी त्यागी आणि अनिल झा हे नुकतेच भाजप सोडून आपमध्ये सामील झाले होते. तर, झुबेर चौधरी, वीरसिंग धिंगाण आणि सुमेश शौकीन हे कॉग्रेसमधून आले आहेत. ही मंडळी आप सोडून जाण्याची भीती असल्यामुळे केजरीवाल यांनी त्यांची नावे उमेदवारांच्या पहिल्या यादीत समाविष्ट केली असल्याची चर्चा रंगली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत आप पक्षाला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे. मुळात, दिल्लीत दहा वर्षांपासून आपची सत्ता आहे. अशात आप सरकारच्या विरोधात सत्ताविरोधी लाट बघायला मिळत आहे. सध्या आपचे 62 आमदार आहेत. यातील किमान 25 ते 30 आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. शिवाय, भाजप आणि कॉग्रेसमधून आलेल्या सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी आपचे नेते आधीपासून तयारी करीत आहेत. या जागांवर आपच्या नेत्यांकडून बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे.
दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ 23 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत आपने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळविला होता. भाजपचे आठ आमदार निवडून आले होते. मात्र, कॉग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. दिल्लीत आप आणि भाजपमध्ये मुख्य लढत होणे आहे. आप पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची तयारी करीत आहे. तर जवळपास तीन दशकांचा वनवास संपविण्यासाठी भाजप मैदानात उतरणार आहे.





