Delhi air pollution : जीआरएपी – 4 हे निर्बंध शिथिल झाल्यानंतरही दिल्ली सरकार वाहनांसाठी पीयुसी नाही, इंधन नाही हे धोरण लागूच ठेवणार असल्याचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेत बोलताना सिरसा म्हणाले की, वायू प्रदूषणाविरोधातील उपायांची कठोर अंमलबजावणी सुरू राहील आणि प्रदूषण नियंत्रण (पीयुसी) प्रमाणपत्र नसलेल्या कोणत्याही वाहनाला शहरात परवानगी दिली जाणार नाही. तपासणीत अनेक पीयुसी केंद्रे कार्यरत नसल्याचे तसेच १२ केंद्रांमध्ये सदोष उपकरणे आढळल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित केंद्रांना निलंबित करून नोटिसा देण्यात आल्या असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.