थोपटेवाडी येथील बेकायदा स्मशानभूमी हटविणार?

माळेगाव – ग्रामपंचायत थोपटेवाडी (ता. बारामती) येथील पाटबंधारे विभागाच्या जागेत परवानगीविना बेकायदेशीरपणे अतिक्रमण करीत बांधलेली स्मशानभूमी हटवावी या मागणीसाठी थोपटेवाडीतील पृथ्वीराज नलवडे या तरुणाने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण केल्यानंतर ही स्माशनभुमी हटविण्यात येईल, असे आश्वासन उपविभागीय अभियत्यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाची परवानगी न घेता 2002 साली स्मशानभूमीचे बांधकाम केले. याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करताना ग्रामपंचायतीने त्यांच्या मालकीच्या सातबारा जोडत बांधकाम मात्र पाटबंधारे विभागाच्या हद्दीत करून पाटबंधारे विभागाची फसवणूक केली आहे. मात्र, पाटबंधारे विभागाने त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. नलवडे यांनी माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सदर बांधकाम केलेली जागा पाटबंधारे विभागाच्या हद्दीत येते. ग्रामपंचायत प्रशासनानेही हे बांधकाम पाटबंधारे विभागाच्या हद्दीत केल्याचे मान्य केले आहे. यावर पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतीला तात्काळ अतिक्रमण काढा अशा सूचना केल्या. मात्र ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यास नकार देत पाटबंधारे विभागाने अतिक्रमण काढावे, अशी भूमिका घेतली आहे.
अतिक्रमण हटविण्याचे अधिकार मला नाहीत. त्यामुळे याबाबत वरिष्ठ कार्यालयाला वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला असून कायदेशीर बाबींची पूर्तता करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
– ए. बी. जमदाडे उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग





