प्रभात वृत्तसेवा देहूरोड – ऐतिहासिक धम्मभूमीच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (दि. २५) भक्तिभावपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. धम्मजागृती अभियान, महाबुद्धवंदना, पंचशील ध्वजारोहण, धम्मदिशा, धम्मप्रवचन, विविध धार्मिक विधी तसेच सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तूपाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच लाखो बांधवांनी ऐतिहासिक बुद्धविहार परिसरात गर्दी केली होती. परिसरात भाविकांचा अक्षरशः जनसागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. संपूर्ण परिसर बुद्धं शरणं गच्छामि आणि जय भीमच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता. भीम बांधवांच्या सेवेसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, मंडळे व प्रतिष्ठानांच्या वतीने अन्नदान व सेवा उपक्रम राबविण्यात आले. चहा, पाणी, पोहे, अल्पोपहारासह मसाला भात, पुरी-भाजीचे मोफत भोजन भाविकांना देण्यात आले. याशिवाय फोटो, मूर्ती, खेळणी, पुस्तके, कॅलेंडर आणि विविध साहित्य विक्रेत्यांच्या दुकानांनी परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराचे महत्व अनन्यसाधारण आहे. २५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रह्मदेशातील रंगून येथून आणलेली भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्वतःच्या हस्ते येथे प्रतिष्ठापित केली होती. या ऐतिहासिक घटनेला यंदा ७१ वर्षे पूर्ण झाल्याने देशभरातून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येथे दाखल झाले होते. सकाळपासूनच बुद्धमूर्ती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तूपाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि मेणबत्ती प्रज्वलनाने करण्यात आली. सकाळी ८ ते ११ या वेळेत महाबुद्धवंदना, शीलयाचना, क्षमायाचना, अभिवादन गाथा, बुद्धपूजा, भीमस्मरण, त्रिरत्नवंदना, बुद्धवंदना व धम्मवंदना हे धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर संघवंदना, भिक्षूंचे आशीर्वचन व बावीस प्रतिज्ञांचे सामूहिक ग्रहण करण्यात आले.दिवसभर विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मै बुद्ध गया बोल रही हूँ या विषयावर आधारित एकपात्री नाट्यप्रयोग, चार दिवस चाललेल्या धम्मभूमी फेस्टिव्हलमधील २२ प्रतिज्ञा पाठांतर स्पर्धा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड या विषयावरील वक्तृत्व स्पर्धा, बहुजन महानायक व महानायिकांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्य स्पर्धा, महिलांसाठी मुला-मुलींवर धम्मसंस्कार कसे करावेत या विषयावरील निबंध स्पर्धा, प्रबुद्ध कवी संमेलन तसेच राज्यस्तरीय भीमशाहीर गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष टेक्सास गायकवाड व अष्टप्रधान मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक स्वयंसेवकांनी दिवसभर परिश्रम घेतले.