Dehu Road Cantonment Board – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गेल्या पाच वर्षांपासून सर्वसाधारण सभांपासून पत्रकारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती लपवून आणि माध्यमांना डावलून सुरू असलेल्या या कारभारामुळे पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. फेब्रुवारी २०२१ पूर्वी नगरसेवकांचा कार्यकाल असताना प्रत्येक सर्वसाधारण सभेची माहिती पत्रकारांना किमान दोन दिवस आधी दिली जात होती. त्यामुळे सभेतील चर्चा, निर्णय आणि जनतेशी संबंधित मुद्दे खुलेपणाने समाजासमोर येत होते. मात्र नगरसेवकांचा कार्यकाल संपल्यानंतर सध्या ब्रिगेडियर (अध्यक्ष), मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी अशा त्रीसदस्यीय व्यवस्थेकडे कारभार गेल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक सर्वसाधारण सभा पार पडल्या असल्या, तरी एकाही सभेसाठी पत्रकारांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे, तर या सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांची अधिकृत माहितीही प्रसारमाध्यमांना देण्यात आलेली नसल्याने संपूर्ण कारभार बंद दाराआड सुरू असल्याची भावना बळावत आहे. पत्रकारांना दूर ठेवण्यामागील उद्देश काय, कोणते निर्णय लपवले जात आहेत, आणि जनतेपासून माहिती का दडपली जात आहे, असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लोकशाही व्यवस्थेत माध्यमे ही जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचे महत्त्वाचे साधन असताना, त्यांनाच दूर ठेवण्याचा प्रकार हा लोकशाही मूल्यांवर आघात करणारा असल्याची टीका व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होणाऱ्या सर्वसाधारण सभा जर गुप्तपणे घेतल्या जात असतील, तर जनतेचा प्रशासनावरचा विश्वास कसा टिकणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पत्रकार आणि नागरिकांकडून संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ भूमिका स्पष्ट करावी, पुढील सर्वसाधारण सभांसाठी पत्रकारांना अधिकृत निमंत्रण द्यावे आणि मागील सभांतील निर्णयांची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत आहे. एकूणच, पारदर्शकतेचा अभाव आणि माहिती दडपण्याच्या या प्रकारामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, यावर प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.