प्रभात वृत्तसेवा देहूगाव( रामकुमार अग्रवाल ) – देहू नगरपंचायतीच्या कचरा डेपोला लागणाऱ्या वारंवार आगीमुळे परिसरात धुराचे लोट आणि नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. महिन्यातून किमान पाच ते सहा वेळा लागणारी आग नेमकी लागते की लावली जाते? असा गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.नगरपंचायतीच्या हद्दीतील बाह्यवळण मार्गालगत असणाऱ्या खाणीमध्ये हा कचरा डेपो आहे. बाहेरून येणारा कचरा रोखण्यासाठी डेपोवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सोबतच दोन कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तरीदेखील आगीच्या घटना सुरूच आहेत.शनिवारी (दि. २९) सायंकाळी पुन्हा डेपोला आग लागली. नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रित मिळवले. मात्र रविवारी सकाळी चारही बाजूंनी पुन्हा आग भडकली. धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरत असल्याने परिस्थिती गंभीर झाली होती. त्यानंतर वडगाव नगरपंचायतीचे अग्निशमन वाहन पाचारण करून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे वाढणारा धूर, प्रदूषण आणि नागरिकांचे होणारे हाल याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन, जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.या वारंवार लागणाऱ्या आगीमुळे अनेक संशय निर्माण होत आहेत. डेपोवर कर्मचारी असतानाही आणि सीसीटीव्ही असतानाही आग कशी लागते, यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. जेसीबी आणि कर्मचाऱ्यांवर होणारा मोठा खर्च यामागे कुणाचा स्वार्थ दडलाय का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. डेपोची जागा बदलण्यासाठी आग लावल्याचा नागरिकांचा आरोप कचरा डेपोजवळच मोठमोठे गृहप्रकल्प आणि प्लॉटिंग प्रकल्प उभारले जात आहेत. सदनिकांच्या बाजारभावावर परिणाम होऊ नये आणि प्लॉट विक्री सुरळीत व्हावी म्हणून काही बांधकाम व्यावसायिकांकडूनच आग लावली जाते, असा गंभीर आरोप नागरिक करीत आहेत. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे डेपो हलवण्याचा मुद्दा पुढे यावा, यासाठी जाणीवपूर्वक आग लावली जात असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. आरोग्य आणि पर्यावरणाला वाढता धोका कचरा जळाल्याने निर्माण होणाऱ्या धुरात प्लास्टिक, रबर, सेंद्रिय कचरा आणि विविध रासायनिक घटक जळून विषारी घटक हवेत मिसळतात. त्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि दमा असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जाणवतो. धुरातील रासायनिक घटकांमुळे डोळ्यांत पाणी येणे, लालसरपणा आणि त्वचेवर पुरळ किंवा खाज निर्माण होऊ शकते. सोबतच हे विषारी कण श्वसनासोबत हृदयावर ताण आणतात, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. सतत हा धूर शरीरात गेल्यास फुफ्फुसांची क्षमता कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती घटणे आणि कर्करोगासारखे दीर्घकालीन धोके संभवतात.