Dehu Nagar Panchayat: देहू नगरपंचायत नगराध्यक्षांचा राजीनामा; आठवडाभरात होणार निवडणूक
Dehu Nagar Panchayat: आठवडाभरात निवडणूक, स्मिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा

देहूगाव – देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाबाबत पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विद्यमान नगराध्यक्ष पूजा दिवटे यांनी मंगळवारी (दि. २४) जिल्हाधिकारी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. त्यामुळे आगामी आठवडाभरात होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे देहूकरांचे लक्ष लागले आहे.
बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका स्मिता चव्हाण यांचे नाव पुन्हा नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्यांची निवड झाल्यास दुसऱ्यांदा नगराध्यक्षपद भूषवितील.
देहू नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर झालेल्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १४, भाजपचा एक आणि दोन अपक्ष नगरसेवक विजयी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने भाजप तसेच अपक्ष नगरसेवकांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली.
Satara: मुख्याधिकाऱ्यांसाठी निवासस्थानाचा प्रस्ताव
नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते. या प्रवर्गातून स्मिता चव्हाण आणि पूजा दिवटे या दोन महिला नगरसेविका निवडून आल्या होत्या. त्यानंतर झालेल्या राजकीय वाटाघाटी आणि तडजोडीनंतर ११ फेब्रुवारी २०२२ रोजी स्मिता चव्हाण यांची देहूच्या प्रथम नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती.
चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी ९ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यामुळे सत्ताधारी गटातील नगरसेवकांनीच नगराध्यक्षांविरोधात भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र त्यानंतर आमदार सुनील शेळके यांच्या मध्यस्थीने राजकीय घडामोडींना वेगळे वळण मिळाले.
नगरपंचायत सदस्यांनी चव्हाण यांच्यावरील अविश्वास ठराव मागे घेतला. त्याच कालावधीत चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला नगराध्यक्षपदाचा राजीनामा मंजूर झाला. चव्हाण यांनी सुमारे २१ महिने नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी पूजा दिवटे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली. पूजा दिवटे यांनी त्यानंतर देहू नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
गेल्या सुमारे ३३ महिन्यांपासून त्या नगराध्यक्षपदावर होत्या. मात्र आता बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा नगरपंचायतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दिवटे यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर नियमानुसार आगामी आठवडाभरात नगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बिनविरोध की निवडणूक?
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष स्मिता चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची बिनविरोध निवड होणार की निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. चव्हाण यांची पुन्हा निवड झाल्यास त्यांना एकाच पंचवार्षिक कार्यकाळात दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. पंचवार्षिक कार्यकाळातील उर्वरित कालावधीसाठी, म्हणजे १० फेब्रुवारीपर्यंत, त्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याची शक्यता आहे.
नव्या नेतृत्त्वासमोर आव्हाने
स्मिता चव्हाण यांची पुन्हा नगराध्यक्षपदी निवड झाल्यास नगरपंचायतीच्या कारभाराची दिशा काय राहणार, याबाबतही उत्सुकता आहे. देहू हे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे शहर असल्याने शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वाहतूक, आरोग्य, कचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी सुविधांशी संबंधित प्रश्न महत्त्वाचे आहेत.
नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नव्या नेतृत्वासमोर या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे आव्हान राहणार आहे. त्याचबरोबर सत्ताधारी गटातील अंतर्गत समन्वय राखणे आणि नगरपंचायतीचा कारभार सुरळीत चालविणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.





