बीज सोहळ्यासाठी देहूनगरी, प्रशासन सज्ज

पथदिवे, औषध फवारणी, सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात
देहूरोड (वार्ताहर) – संत तुकाराम महाराजांच्या बीज सोहळ्यातील भाविकांच्या सोयीसुविधा, कामांसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थान व देहू ग्रामपंचायत प्रशासनाची जोरदार लगबग सुरू आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 372 वा (सदेह वैकुंठ गमन) बीज सोहळा बुधवारी (दि. 11) संपन्न होणार आहे. हा सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात राज्यभरातून सुमारे चार-पाच लाख भाविक सहभागी होत असतात. त्यांच्या सोयी सुविधांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने आणि देहू ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कामांना गती आली आहे. नित्यनियमित करण्यात येणाऱ्या कामांसह घाट स्वच्छता,कचराकुंड्यांमधील कचरा उचलणे, बंद असलेले पथदिवे दुरुस्त करणे, तसेच गटार, नाल्यांवर व दुर्गंधीच्या ठिकाणी औषध फवारणीसाठी डीडीटी पावडर टाकण्याची कामे सुरू आहेत. ही माहिती ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर यांनी दिली आहे.
श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने मुख्य मंदिराच्या अंतर्गत भागातील फ्लोरिंगचे आणि श्री संत तुकाराम शिळा मंदिराचे जीर्णोद्धार बांधकाम सुरू आहे. हे अपूर्ण काम सोहळ्यापूर्वी तात्पुरते थांबविण्यात आले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविकांना त्रास होऊ नये यासाठी मंदिर परिसर, दर्शनबारी, वैकुंठ गमन येथे मंडप उभारणीचे काम सुरू आहे. सोहळ्याच्या दिवशी मुख्य मंदिरातून वैकुंठ गमन स्थान येथे संत तुकाराम महाराज यांची पालखी जात असते. या पालखीतील दिंडीचे मानकरी, सेवेकरी, विणेकरी तसेच विविध सामाजिक स्वयंसेवी सेवक यांच्याशी संस्थानने पत्रव्यवहार केला आहे.
नादुरुस्त झालेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यात येत असून, संत तुकाराम महाराज यांचे सुपुत्र पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी समोरही मंडप उभारणी करण्यात येणार आहे. मंदिर परिसर स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी विश्वस्त संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे,माणिक महाराज मोरे आदींच्या उपस्थितीत दिली.
घाट परिसर भाविकांसाठी ठेवणार मोकळा
वैकुंठगमन सोहळ्यासाठी गोपाळपुरा (वैकुंठगमन स्थान) परिसरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असल्याने इंद्रायणी नदी घाट परिसर भाविकांसाठी मोकळे ठेवण्यात येणार आहे. घाटावर होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी पर्यायी जागेची व्यवस्था करण्यात येणार आहे.





