Degree Certificates : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांची पदवी प्रमाणपत्रे (Degree Certificates) दीक्षांत समारंभापूर्वीच बऱ्याच आधी मिळण्याची शक्यता आहे. कारण निकाल जाहीर होताच ही प्रमाणपत्रे डिजीलॉकरवर अपलोड करण्याचे निर्देश राज्य सरकारने विद्यापीठांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा विलंब टाळणे, हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थी त्यांचे निकाल जाहीर होताच परदेशी विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्था, शिष्यवृत्ती, इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींसाठी अर्ज (Degree Certificates) करतात. मात्र, निकाल जाहीर होणे आणि दीक्षांत समारंभ पार पडणे यांमधील कालावधीमुळे विद्यार्थ्यांना अनेकदा विहित मुदतीमध्ये आपली पदवी प्रमाणपत्रे सादर करताना अडचणींचा सामना करावा लागतो. Degree Certificates पदवी प्रमाणपत्रे (Degree Certificates) मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही शैक्षणिक किंवा करिअरविषयक संधी गमावू नयेत. एखाद्या विद्यार्थ्याने आपला अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आणि त्याचा निकाल रीतसर जाहीर झाल्यानंतर त्याचे पडताळणी केलेले पदवी प्रमाणपत्र लवकरात लवकर डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिले गेले पाहिजे. डिजीलॉकरमुळे विद्यार्थ्यांना एक सुरक्षित आणि सहज उपलब्ध होणारे डिजिटल कागदपत्र मिळेल, ज्याचा वापर शैक्षणिक आणि व्यावसायिक उद्देशांसाठी जेव्हा जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा करता येईल, असे त्यांनी म्हटले.