पुणे : पीएसीएल कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून तीन वर्षात दुप्पट रकमेचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी नितीन नारायण थोपटे याच्या पोलिस कोठडीत 3 डिसेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. पौड न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सागर मोहिते यांनी हा आदेश दिला. आरोपीने सुस येथील जमीन मिळकतीची विक्री करून तब्बल 27 कोटींचा घोटाळा केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आरोपीच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने गंभीर गुन्हा केला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्याच्या साथीदार अद्याप फरार असून त्यांना अटक करायची आहे. गुंतवणुकदारांच्या रकमेतून घेतलेल्या जमिनीवर खरेदी विक्रीसाठी निर्बंध असताना देखील त्यांची कोणतीही सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता विक्री केली आहे. जमीन मिळकतीचे तुकडे पाडून सदर जमीनी सर्वसामान्य लोकांस विक्री करून त्यांची फसवणूक केली आहे. आरोपींनी संगनमत करून कंपनीचे नावे बनावट खोटे ठराव बनवुन खोटी कागदपत्रे अस्तित्वात आमून निर्बंधित केलेल्या जमीन मिळकतींची बेकायदेशीररित्या विक्री करून नफा मिळविल्या असल्याने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील नितीन अडागळे आणि गुंतवणूकदार संघटनेच्या वतीने ॲड. निनाद बागमार आणि ॲड. चेतन फटाले यांनी केली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीच्या पोलिस कोठडीत 3 डिसेंबर पर्यंत वाढ केली. पोलीस आयुक्त विनय चौबे, उपायुक्त गुन्हे शाखा डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन घाटे, बारटक्के आणि सहारे यांचे पथक गुन्ह्याचा तपास करीत आहे.