हसन मुश्रीफांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल

कोल्हापूर – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात शंभर कोटी रूपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोल्हापूर दिवाणी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे.

आम्हीच पुरविलेले कागदपत्रे घेवुन आमच्यावर खोटे नाटे आरोप केले जात आहेत, किरीट सोमय्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे आरोप केले आहेत, असे मुश्रीफ यांनी दाव्यात नमूद केले आहे. हा सर्व खटाटोप आम्हांला बदनाम करण्याच्या दृष्टीने सुरु आहे, आमचे चारित्र्यहनन थांबवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

हा दावा सहावे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान किरीट सोमय्या हे कोल्हापूरात आहेत. त्यांनी मुरगुड पोलिस ठाण्यात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप फेटाळून लावले होते. तसेच सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले होते. अखेर आज त्यांनी सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

किरीट सोमय्या यांनी नेमके कोणते आरोप केले ?
हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 127 कोटींचा घोटाळा केला असून हसन मुश्रीफ यांच्या पत्नीचे शेअर सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात आहेत. तसेच संताजी घोरपडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा केला आहे, असे आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.