Budget 2024: संरक्षण क्षेत्रासाठी 6 लाख 21 हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली – यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी ६,२१,९४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जी गेल्या वर्षीच्या ५.९४ लाख कोटी रूपये इतकी होती. यंदाचा संरक्षण खात्यावरील खर्च भारत सरकारच्या एकूण बजेटच्या १२.९ टक्के इतका आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, देशांतर्गत खरेदीसाठी १ लाख ५ हजार कोटी रुपयांच्या तरतूदीमुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला आणखी चालना मिळेल. यंदा संरक्षण खात्यासाठी सर्वाधिक तरतूद केल्याबद्दल मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो असेही त्यांनी नमूद केले आहे.
लष्कराच्या भांडवली खर्चासाठी १ लाख ७२ हजार कोटी रुपयांचा निधी सशस्त्र दलांच्या क्षमतांना आणखी बळकट करेल. असेही त्यांनी नमूद केले आहे.त्यात बॉर्डर रोडच्या तरतूदीत ३० टक्के वाढ करण्यात आली असून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला देण्यात आलेली ६५०० कोटी रूपयांची तरदूत सीमा क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्यासाठी उपयोगी ठरेल असे त्यांनी म्हटले आहे.
संरक्षण उद्योगांमध्ये स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी, स्टार्टअप्स, एमएसएमई आणि नवोन्मेषकांनी दिलेल्या तांत्रिक उपायांसाठी ५१८ कोटी रूपयांचीही तरतूद करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातही सरकारचे संरक्षण बजेट ६.२१ लाख कोटी रुपये ठेवण्यात आले होते.





