युट्यूूबवर महिलेची बदनामी करुन जीवे मारण्याची दिली धमकी ; चॅनेलवर गुन्हा दाखल

पुणे- पर्ल ऍग्रोटेक कार्पोरेशन लिमिटेड चिट फंड कंपनीच्या घोटाळा प्रकरणात याचिकाकर्ता असलेल्या महिलेची बदनामी करण्यात आली. संबंधीत महिलेला ब्रोकर म्हणून नेमले गेले असल्याचे सोशल मिडियावर भासवण्यात आले असून तीचा एका युट्यूब चॅनेलवर बदनामिकारक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. यामध्ये तीला जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात संबंधीत युट्यूब चॅनेलवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हडपसर येथे रहाणाऱ्या एका महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी या एका सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा आहेत. ही संस्था पर्ल चिट फंड प्रकरणी फसवणूक झालेल्या देशभरातील गुंतवणूकदारांच्या हक्कांसाठी लढत आहे.
त्यांनी गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. तसेच संस्थेच्यावतीने ऑस्ट्रेलियातील फेड्रल न्यायालयातही लढा दिला आहे. फेड्रट न्यायालयाच्या आदेशान्वये पर्ल कंपनीच्या प्रॉपर्टी विक्री मधून आलेली अंदाजे 400 करोड रुपयांची रक्कम सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या आर.एम.लोढा कमिटीच्या खात्यात जमा करुन त्याचे नियमन करुन गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सद्य स्थितीत हा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल असून फिर्यादी महिला यामध्ये पिटीशनर(याचिकाकर्ती) म्हणून काम पहात आहे. दरम्यान त्यांच्या संस्थेचे माजी सचिव गणेश खांदवे यांनी त्यांना आलेला एका करारनाम्याचा मेसेज सर्व सभासदांना पाठवला होता. यामध्ये फिर्यादी महिलेला पर्ल कंपनीची हरियाणा येथील मालमत्ता खरेदीसाठी लोढा कमिटीने ब्रोकर म्हणून विश्वस्त केले असून तीला 15 लाख ब्रोकरेज मिळाले आहे. तर उर्वरीत 2 कोटी 85 लाखाची रक्कम जमिनीचा करार झालेला अमितकुमार नेपालसिंग(रा.न्यु दिल्ली) कन्वेनस डीडीच्या नोंदणीच्यावेळी देतील असा उल्लेख होता.
या करारनामा बनावट असून त्यावर असलेली सही आपली स्वत:ची नसल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. गुंतवणूकदारांचा फिर्यादीवरील विश्वास डळमळीत व्हावा म्हणून हा प्रकार करण्यात आला असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. तर दुसरीकडे एखा युट्यूब चॅनेलवरुन त्यांच्यावर आक्षेपार्ह आरोपी, चारित्र्याची बदनामी व जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक टापरे करत आहेत.





