राहुल गांधींविरोधात पुण्यात मानहानीचा खटला दाखल; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण ?

पुणे – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याआधी त्यांना मोदी आडनावाबाबत बदनामी केल्याने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतर त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले. याप्रकरणी काँग्रेसकडून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. याशिवाय सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याप्रकरणी आता राहुल गांधींविरोधात नव्याने मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली आहे.
राहुल गांधी यांनी इंग्लंड येथील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी खोटी माहिती देऊन त्यांचा अपमान केला. त्यांनी एका भेटीदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुस्तकाचा संदर्भ देताना चुकीची माहिती दिली आहे. ‘सावरकरांनी आपल्या 5 ते 6 मित्रांच्या मदतीने एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण केली होती आणि त्यांनी या मारहाणीचा आनंद लुटला होता,’ असे राहुल गांधींनी इंग्लंडमध्ये वक्तव्य केले होते.
सात्यकी म्हणाले की, “राहुल गांधी केवळ व्होट बँकेसाठी तथ्य नसताना अशी विधाने करत आहेत. आता याबाबत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने आम्हाला 15 एप्रिल तारीख दिली आहे. राहुल गांधी यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत महाराष्ट्र न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सावरकर यांची बदनामी करण्यासाठी राहुल गांधी यांनी अपमानजनक वक्तव्य केले आहे. त्याची शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”





